नगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 टक्के जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला.त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेसाठी 18 जागा तर बारा नगरपालिकांत नगरसेवक पदांच्या 76 जागांवर ओबीसी प्रवर्गातील नागरिक निवडून जाणार आहेत. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकपदासाठी इच्छुक असणार्या व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Ahilyanagar News Update)
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील एकूण जागांपैकी 27 टक्के जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तथा ओबीसी समाजासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने तीन दशकांपूर्वी घेतला होता. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील अनेकांना महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व ग्रामपंचायतीचे सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.
मध्यंतरी नागरिकांचा मागास प्रवर्गातील अनेकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उच्च पदापर्यंत मजल मारली आहे. त्यासाठी आतापर्यंत किती आमदार, खासदार तसेच महापौर, नगराध्यक्ष तसेच सरपंच झाले आहेत. याबाबत शासनाने सर्व्हे केला होता. त्यानुसार मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवू नयेत असा निर्णय झाला होता. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाली. पुन्हा ओबीसीसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाला. मध्यंतरी कोणीतरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कालपरवाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे ओबीसी प्रवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 17 प्रभागरचना असून, प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 68 नगरसेवकपदांसाठी निवडणुका होणार आहेत. आता 27 टक्क्यांनुसार 18 जागा नागरिकांच्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील 18 व्यक्ती नगरसेवक म्हणून अहिल्यानगर महापालिकेत दिसून येणार आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा या अकरा नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायती या बारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या बारा नगरपालिका व नगरपंचायतीतून 289 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी गेल्या महिन्यांत विभागीय आयुक्त तथा नगरपरिषद प्रशासनाचे प्रादेशिक संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांनी अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी प्रवर्गातील राखीव जागांची संख्या निश्चित केली असून, राजपत्रात प्रसिध्द केली आहे.
बारा नगरपालिकांमधून आता 76 जागा ओबीसीसाठी राखीव असणार आहेत. त्यानुसार आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.