ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल Pudhari
अहिल्यानगर

OBC Mahamelava Daityanandur: "मुंडे असते तर ही वेळ आली नसती" – ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

दैत्यनांदूर येथे ओबीसी महाएल्गार मेळावा; गावगाड्यातील ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी तालुका : पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ओबीसी समाजाने एकवटले पाहिजे; अन्यथा गावगाड्यातील सामान्य ओबीसी बांधवांवर हल्ले वाढत जातील. आज ओबीसींचे अस्तित्व धोक्यात आले असून, गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ ओबीसींवर कधीच आली नसती, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.तालुक्यातील दैत्यनांदूर येथे आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते.(Latest Ahilyanagar News)

भगवानगड परिसरातील गावातून आलेल्या ओबीसी नेत्यांसह नागरिकांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभा स्थळापर्यंत वाजतगाजत हाके यांची मिरवणूक काढण्यात आली. भर पावसात ही सभा पार पडली. या मेळाव्यास नवनाथ वाघमारे, राजेंद्र दौंड, गोकुळ दौंड, अरुण मुंडे, बाळासाहेब सानप, सुरेश आव्हाड, किसन आव्हाड, अजिनाथ दहिफळे, बळीराम खटके, बाळासाहेब वाघ, संगीता ढवळे, मुकुंद आंधळे यांसह विविध ओबीसी नेते उपस्थित होते.

हाके म्हणाले की, सत्ताधारी आपल्या बाजूने बोलायला तयार नाहीत. एकही आमदार आमच्या पाठीशी उभा नाही. आता ओबीसींनी एकत्र येऊन लढा उभारावा लागेल. गावगाड्यातील ओबीसींवर हल्ले होत असताना आपण शांत राहिलो, तर भविष्यात परिस्थिती बिकट होईल. आसमानी व सुलतानी संकटावर मात करायची आहे. राज्यात आज अशी परिस्थिती झाली आहे की, आम्ही काही आरक्षणाविषयी बोलायला लागलो की त्याला लफडे ठरवले जाते आणि कुणी दुसरे काही बोलेल तर त्याला प्रेम ठरवले जाते, अशी टीका त्यांनी या वेळी केली.

मुलींना शिकवायचं, तिला संघर्ष करायला शिकवायचं. आमच्यावर झालेल्या हल्ल्यांना मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाहीत. अजून 70 लोकांना मारले जाणार आहे, असे काही लोक संकेत देत आहेत. खुळखुळ्या माणसाने मोर्चा काढला तर रस्ते ठप्प होतात, पण गावगाड्यातील ओबीसी एक झाला तर रस्ता मोकळा राहणार नाही, असाही इशारा त्यांनी या वेळी दिला.

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असूनही आजही फासेपारदे समाजातील महिलेला अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नाही, ही बाब लाजीरवाणी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक सुरेश आव्हाड, तर सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी करून आभार बाबासाहेब वाघ यांनी मानले.

आमचा लढा थांबणार नाही

आम्ही संविधानाची भाषा बोलतो, ओबीसींच्या न्याय्यहक्कासाठी झगडतो. हल्ला करून आमचा लढा थांबणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, ओबीसी नेते, आमदार-खासदार यांनी आता भूमिका स्पष्ट करावी. आज ओबीसींचे आरक्षण गेले असून, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गप्प आहेत. हा लढा आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवणार आहोत, असे हाके यांनी ठामपणे सांगितले.

मराठा आरक्षण उपसमितीवर टिका

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे आज जिवंत असते तर या राज्यातील ओबीसींच्या आरक्षणाची बचाव करण्याची वेळ कधीच आली नसती. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे असून, आरक्षण संपविण्याचे काम समितीने केले आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी या वेळी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT