

एकरुखे: दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच महायुतीचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठा निधी हा सिंचनासाठी उपलब्ध झाला आहे.
मागच्या पिढीने पाण्याची वाट पाहिली, या पिढीने पाणी पाहिले आणि येणाऱ्या पिढीसाठी पाण्याचे नियोजन करून राज्य दुष्काळमुक्त कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. पाण्यावर राजकारण न करता पाण्याच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा कार्यालय, अधिकारी कर्मचारी निवासस्थान विश्रामगृह तसेच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या खुल्या कांदा मार्केटचा शुभारंभ, नुतन शॉपिंग कॉम्प्लेक् भूमिपूजन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 22 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री विखे पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, रघुनाथ बोठे, मुकुंदराव सदाफळ,मोहनराव सदाफळ, नंदू शेठ राठी, उत्तमराव निर्मळ, कैलास बापू, अभय शेळके, राजेंद्र वाबळे, नितीन कापसे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, वैभव लांडे, विवेक गुंड, मंगेश सुर्से आदींचा विविध आदींसह बाजार समितीचे संचालक आणि पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध व्हावा, हाच सरकारचा प्रयत्न आहे. पाण्यावरून प्रादेशिक वाद निर्माण करणारे आता पाणी आल्याने श्रेय घ्यायला पुढे आले आहेत, परंतु आता पाणी आले. कुणी आणले आणि ते कसे आले, हे जनतेला ठाऊक आहे. ज्यांना जलनायक, जलदूत व्हायचे त्यांनी व्हावे परंतु आपल्याला पाण्यासाठी राजकारण न करता पाणी उपलब्ध कसे होईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. निळवंडेचे पाणी आता थेट गोदावरी नदीत पोहचले आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे पाणी जिरायत भागाला मिळाले आहे. त्यांच्या प्रयत्नातून प्रत्येक गाव जलमय झाले आहे. आता जे पाणी मागत होते, तेच पाणी बंद करा, अशी मागणी ही करू लागले, हा आपल्या दृष्टीने मोठा आनंदाचा क्षण असल्याचे सांगत सांगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.
गोदावरी कालव्यासाठी सरकारने 191 कोटी दिले, आता 200 कोटींची ही मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून गोदावरी गोदावरी कालव्याचे आणि पोट साऱ्यांची दुरुस्ती होणार असून यामुळे मोठा फायदा या भागातील जनतेला होणार आहे.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या माध्यमातून सर्वात जास्त मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये काम झाली आहेत.
महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी या सार्वजनिक उपक्रमासाठी देता आल्या, त्या माध्यमातून आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भव्य दिव्य असे खुले कांदा मार्केट नूतन शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह उभे राहत आहे. याशिवाय अनेक ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध झाल्याने घरकुल आणि गावांच्या विकासाला चालना मिळाली आहे. येणाऱ्या नगरपालिका पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद परिषदेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत महायुतीच्या मागे उभे रहा, असे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती माहिती देत असताना शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी बाजार समिती ही कायमच प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालक डॉ. शांताराम चौधरी तर आभार राजेंद्र वाबळे यांनी मानले.
शेतकरी अडचणीत; नागरी सत्कार नाकारला
आज शेतकरी हा अडचणीत आहे, तो दुःखात आहे, अशा प्रसंगी आपण माझा नागरी सत्कार करू नका, नैसर्गिक आपत्ती दूर झाले की आपण नियोजन करू असे सांगत मंत्री विखे पाटील यांनी आयोजित केलेला नागरिक सत्कार नाकारला. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मदतीसाठी भरीव निर्णय घेईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.