नगर: अहिल्यानगर केडगाव परिसरातील एका खासगी गोदामावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पोषण आहाराची 7 हजार 500 पाकिटे आढळून आली आहेत. ‘या पाकिटांशी आमचा संबंध नाही’ असे म्हणत शासनाच्या जिल्हा महिला बालकल्याण विभाग तसेच नागरी बालकल्याण विभागाने हात झटकले आहेत. त्यामुळे हा पोषण आहार कोणाचा असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी पोषण आहाराच्या पाकिटांचा पंचनामा केला आहे.
नगर - पुणे रोडवरील केडगाव परिसरातील एका खासगी गोदामात महिला बालकल्याण विभागाचा पोषण आहार व बियाणांचा साठा असल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री गोदामावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना पोषण आहाराच्या 150 गोण्या आढळून आलेल्या आहेत. एका गोणीत 50 पाकिटे अशी साडेसात हजार पाकिटे आढळून आली आहेत. तसेच या गोदामात गव्हाचे बियाणे आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली.
पोलिसांनी बुधवारी जिल्हा महिला बालकल्याण विभाग तसे महापालिका अख्यत्यारित असलेल्या नागरी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाय यांनी म्हटले की, अहिल्यानगर महापालिका व भिंगार कॅन्टोन्मेंट या दोन्ही नागरी परिसरातील सात हजार मुलांना पोषण आहार वाटप केला जात आहे. प्रत्येक मुलाला दोन महिन्यांसाठी चार पाकिटे वाटप केली जात आहेत. आम्हाला उपलब्ध झालेली सर्व पाकिटे मुलांना वाटप करण्यात आलेली आहे. जेथे वाटप केली त्यांची सर्व प्रमाणपत्रेदेखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे गोदामात सापडलेली पाकिटांशी आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांकडे नमूद केले.
जिल्हा महिला बालकविकास विभागाकडून ग्रामीण भागात पोषण आहार वाटप केला जात आहे. या विभागाने देखील या पाकिटांशी आमचा काडीचाही संबंध नसल्याचे सांगत अंग झटकले आहे. जिल्ह््यातील या दोन्ही कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या पाकिटांशी आमचा कोणत्याही अर्थाने संबंध नसल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे ही पाकिटे कोणाची आहेत असा प्रश्न पोलिसासह नागरिकांनाही पडला आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी पोषण आहार आणि बियाणांचा पंचनामा केला आहे.
या गोदामात पोलिसांना बियाणांच्या गोण्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. कृषी विभागाच्या वतीने जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी गोदामाकडे धाव घेतली. या गोदामात गव्हाच्या 20 किलो वजनाच्या 272 तर 40 किलो वजनाच्या 203 बॅगा अशा एकूण 475 बॅगा आढळून आल्याचे शिंदे यांनी सांगितले. पोलिसांनी या बियाणांचा पंचनामा केला आहे.
475 गव्हाच्या बॅगा
पवन फर्टिलायझर या कृषी केंद्राने अंकूर कंपनीकडून 106 टन गव्हाचे बियाणे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत खरेदी केले होते. खरेदी केलेली बियाणे या कालावधीत शेतकऱ्यांना विकण्यात आले. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत गव्हाची पेरणी झाली. उर्वरित बियाणे एप्रिलपर्यंत वापरण्यास योग्य आहे. त्यामुळे पवन फर्टिलायझर मालकाने बियाणे परत घेऊन जाण्यास कंपनीला सांगितले. वाहतुकीस परवडणार नसल्याचेकारण कंपनीने दिले. त्यामुळे पवन फर्टिलायझर कंपनीने हे बियाणे भळगट नावाच्या भुसार व्यापाऱ्यास विकलेले आहे. त्यांनी ते गोदामात ठेवले असल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले. पोलिसांनी या बियाणांचा पंचनामा केला आहे. सदर बियाणांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बियाणे रितसर खरेदी केलेले
हे बियाणे पवन फर्टिलायझर चालकांने रितसर कंपनीकडून खरेदी केलेले आहे. खरेदीच्या पावत्या देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे. बियाणांची मुदत एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे त्यांनी धान्य म्हणून संबंधित व्यापाऱ्यांना विकलेले आहे. व्यापाऱ्यांनी ते या गोदामात ठेवले आहे. बियाणे अवैध किंवा बोगस असल्याचा कोणताही प्रकार नसल्याचे सुधीर शिंदे यांनी म्हटले.
पोषण आहार ठेवण्याचा परवानाच नाही
केडगाव येथील गोमात पोषण आहाराची पाकिटे सापडली. पोलिसांनी कारवाई करताना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचरण केले होते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित गोदाम मालकाकडे पोषण आहाराचा साठ करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. दरम्यान, आज दुपारी अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे व अन्य अधिकाऱ्यांनी पोषण आहाराचे नमुने घेतले असून, त्याबाबत संबंधित कंपनीकडे पत्र व्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.