Nilwande Canal Pudhari
अहिल्यानगर

Nilwande Dam Water Supply: निळवंडे धरणाचे पाणी आणखी तीन गावांना मिळणार; आमदार आशुतोष काळेंच्या सूचनेनंतर उपाययोजनांना वेग

बहादरपूर, अंजनापूर आणि रांजणगाव देशमुखच्या पाझर तलावांसह बंधारे भरणार; ७०० मीटर ओढ्याचे खोदकाम, २०० मीटर पाइपलाइनचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील जवळके, धोंडेवाडी, शहापूर व बहादराबाद या गावांना थेट निळवंडे धरणाचे पाणी मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर आता आणखी तीन गावांना थेट ‘निळवंडे’चे पाणी मिळणार आहे. याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी, प्रत्यक्ष पाहणी करून, पाटबंधारे अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

चालूवर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्यांसह ‘निळवंडे’ कालव्यांच्या आवर्तनावर आमदार आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून आहेत. यामुळे निळवंडे कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनातून चार गावांची अडचण दूर केल्यानंतर आता बहादरपूर, अंजनापूर व रांजणगाव देशमुखच्या पश्चिम भागातील पाझर तलाव व बंधारे चालू आवर्तनातून भरले जावेत, यासाठी त्यांनी मंगळवार (दि.२४) रोजी शेतकऱ्यांसह पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत खोकड विहिर पॉईंट येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी टेल राईट वितरिकेतून हे तलाव व बंधारे भरता यावेत, यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला त्यांनी दिले.

चालूवर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही एकही गाव आवर्तनापासून वंचित राहू नये, पाण्याची समस्या निर्माण होवू नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा आटापिटा सुरु आहे. निळवंडे कालव्याच्या सुरु असलेल्या आवर्तनातून आमदार काळे यांच्या माध्यमातून ओढ्यात ७०० मीटर खोदकाम करून बहादरपूर, अंजनापूर व रांजणगाव देशमुख या गावांचे पाझर तलाव व बंधारे भरले जाणार आहेत, परंतू एवढ्यावरचं न थाबता पुढील आवर्तनापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने २०० मीटर पाईपलाईन टाकून त्यावर व्हाल्व्ह बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पाटबंधारे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांना आमदार काळे यांनी यावेळी भ्रमणध्वनीद्वारे केल्या.

आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या पुढाकारातून ओढ्यात ७०० मीटर खोदकाम करून, पाझर तलाव व बंधारे भरले जाणार आहेत. यामुळे बहादरपूर, अंजनापूर व रांजणगाव देशमुख या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. त्यांनी आमदार काळे यांचे आभार मानले. पाहणी दौऱ्याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता शुभम शिरसाठ, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी तसेच अंजनापूर, बहादरपूर आणि रांजणगाव देशमुखचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

‘निळवंडे’च्या पाण्यापासून बहादरपूरचा पश्चिम भाग वंचित राहत असल्याची व्यथा आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडली. दुष्काळाची तीव्रता आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठीची तळमळ ओळखून त्यांनी तातडीने या प्रश्नाला प्राधान्य देत तळेगाव शाखेच्या वितरिकांचे काम सुरू करून घेतले. पाणी मिळेल, या आशेवर डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा पुढाकार मोठा दिलासा देणारा ठरला आहे, असे मत बहादरपूरचे सरपंचगोपीनाथ रहाणे यांनी यावेळी व्यक्त केले.

‘पाटबंधारे विभागाशी सातत्याने समन्वय साधून, वेळोवेळी योग्य निर्णय घेत, आवश्यक सूचना देत आमदार आशुतोष काळे यांनी पाण्याचा मार्ग मोकळा केला. दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आम्हाला लाभले. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता आम्ही कधीही विसरणार नाही.
गोपीनाथ रहाणे, सरपंच बहादरपूर, ता. कोपरगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT