Nilwande Canal Work Order Pudhari
अहिल्यानगर

Nilwande Canal Work Order: निळवंडे पूरचारी कामाचे कार्यारंभ आदेश जाहीर; आमदार काळेंच्या 'शब्द'पूर्तीमुळे कोपरगावच्या उर्वरित पाझर तलावांना मिळणार पाणी

३.७ किमी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या डिझाईन कामाला गती; श्रेय लाटणाऱ्यांना उपरोधिक सल्ला, लाभक्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी : निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी वेळोवेळी स्वखर्चातून प्रत्येक गावाला चाऱ्या नसतानादेखील पाणी पोहोचविले, परंतू यावर कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी पूर चारी सर्वेक्षण कामाची वर्क ऑर्डर लवकर प्रसिद्ध होवून, प्रत्यक्ष काम तातडीने सुरु व्हावे या उद्देशातून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर व बहादरपूर येथील अंजनापूर पाझर तलाव क्र. 3 ते मंगलमुर्ती कार्यालयापर्यंत 1.2 किमी तर निळवंडे कालवा टेल ते खोकडविहीर 2.5 किमी अशा एकूण 3.7 किलोमीटर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहेत. यामुळे उर्रवरित पाझर तलाव भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

निळवंडे कालवे कामांना गती देण्यासाठी माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी, विरोधी पक्षाचे आमदार असताना स्वतःच्या कार्यकाळात निळवंडे कामाला गती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. 2019 सालच्या विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी, निळवंडे कालवे कामाला गती देणार आहे, असा ‌‘शब्द‌’ निळवंडे डावा कालवा लाभक्षेत्रातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव,अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर आदी गावकऱ्यांना दिला होता.

यावर त्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात ऊर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक 4 साठी 36.33 कोटी तर, टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीसाठी 36.32 कोटी अशा एकूण 72.65 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन केले. त्या कार्यक्रमात लवकरचं बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनविण्याच्या कामास कार्यारंभ आदेश प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती निळवंडे डावा कालवा लाभक्षेत्रातील नागरीकांना दिली होती. त्याप्रमाणे जलसंपदाकडून 3.7 किलोमीटर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनविणे कामाचे कार्यारंभ आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे या गावांमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाठपुराव्याची दखल घेवून, बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक बनविण्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध करण्यात आला, याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे गावकऱ्यांनी आभार मानले.

भगीरथ प्रयत्नांतून निळवंडेचे पाणी फिरले

कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती भागातील विविध गावांमध्ये पिण्यासह शेती सिंचन प्रश्न अतिशय बिकट होता. जिरायती गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावे लागत होते. तेथील पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती पाहून, शेती सिंचन परिस्थिती कशी असू शकते, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही, मात्र ही बिकट परिस्थिती आमदार आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नांतून निळवंडे कालव्याचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात फिरले आहे. परिणामी ती परिस्थिती सकारात्मक बदलली आहे. निळवंडेच्या पाण्यापासून अंजनापूर व बहादारपूरचा पश्चिमेचा भाग वंचित राहत होता. यामुळे उजनी चारी योजना चालवावी लागत होती. धोंडेवाडी, जवळके, बहादाराबाद व शहापूर भागही वंचित राहणार होता.

‌‘त्यांचे‌’ नाहक श्रेय लाटण्याचे प्रयत्न

निळवंडे कालव्याचे पाणी संपूर्ण लाभक्षेत्रात फिरविण्यासाठी अनंत अडचणी असतानाही आमदार आशुतोष काळे यांनी, किती आणि कसा पाठपुरावा केला, हे निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील गावकऱ्यांनी अगदी जवळून अनुभवले, परंतू ज्यांचे याकामात कोणत्याही प्रकारचे काडीचेही योगदान नाही, त्या व्यक्ती नाहक श्रेय लाटण्याचा वारंवार प्रयत्न करतात. निविदा प्रसिद्ध झाली, त्यावेळीही त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आताही कार्यारंभ आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर काही व्यक्ती श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील, परंतू फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी केलेला पत्रव्यवहार व कागदपत्रांची गरज भासल्यास आम्ही ते उपलब्ध करून देऊ, असा उपरोधिक सल्ला अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता दिला आहे.

‌‘कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर व बहादरपूर येथील अंजनापूर पाझर तलाव एकूण 3.7 किलोमीटर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे (पूरचारी) डिझाईन व अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाला आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून गती मिळाली आहे. कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त होवून, निळवंडे कालव्यातून रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी,जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलावांमध्ये बंदिस्त पाईपलाईनने (पूरचारी) पाणी आणण्याचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोपीनाथ रहाणे, सरपंच, बहादरपूर, ता. कोपरगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT