Money Scam Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanar Money Rain Scam: निघोजमध्ये ‘पैशांचा पाऊस’ आमिष; भोंदूबाबाकडून 1 कोटींची फसवणूक

अंधश्रद्धेच्या जाळ्यात पाच जण अडकले; पूजा करून 10 पट परताव्याचे आमिष देत लाखोंचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

निघोज: अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेतून पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या पाच जणांची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना निघोज (ता. पारनेर) येथे समोर आली आहे. शिरूर येथे वास्तव्यास असल्याचे सांगणाऱ्या एका भोंदूबाबाने पैशांची पूजा केल्यास 10 पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून संबंधितांना जाळ्यात ओढल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, निघोजमधील एका व्यक्तीशी ओळख वाढवत भोंदूबाबाने आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला. बनावट भक्तांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्याने संबंधित व्यक्तीला तसेच इतर चार जणांना पैशांच्या पावसाचे स्वप्न दाखवले. त्यानंतर पाचही जणांनी जमीन गहाण ठेवून, दागिने तारण ठेवून, तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन एकूण एक कोटी रुपये उभे केले.

दरम्यान, ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा आयोजित करण्यात आली. पूजेदरम्यान भोंदूबाबाने सर्वांना मौन पाळण्यास सांगून ‌‘तीर्थ‌’ दिले. हे तीर्थ घेतल्यानंतर काही वेळातच सर्व जण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येते. शुद्धीवर आल्यानंतर भोंदूबाबा आणि रक्कम दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्यानंतर संबंधितांनी शिरूर तसेच गुजरातपर्यंत भोंदूबाबाचा शोध घेतला; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. या घटनेबाबत गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू असली, तरी अद्याप पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा व भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सजग राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT