नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारीउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींनी वेग घेतला. पंचरंगी लढतीचे चिन्हे असतांना आम आदमीच्या उमेदवाराने नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेतली. आता महायुती, क्रांतीकारी शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचे 4 जणांनी तर नगरसेवकपदाच्या 24 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार, तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 63 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान, महायुतीमधील अजित पवार गटाने स्वतंत्र लढतीचा नारा दिला आहे. त्यामुळे नेवाशात शिंदे गट शिवसेना व भाजपाची युती दिसणार आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे संजय सुखदान यांनी आम आदमीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पंरतु माघारीच्या दिवशीच उमेदवारी माघारी घेत गडाख गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
नगराध्यक्षपदासाठी डॉ. करणसिंह घुले (शिवसेना, शिंदे गट) नंदकुमार पाटील (गडाख गट-क्रांतीकारी शेतकरी पक्ष), अल्ताफ पठाण (इंदिरा काँग्रेस), सचिन कडू (अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस), अपक्ष- मनोज पारखे, दिनकर घोरपडे, अश्फाक शेख असे सातजण निवडणूक रिंगणात आहेत.
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ संजय बिरादार, मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
आठ वर्षानंतर होत असलेल्या नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांनी विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्षपदासाठी27 तर नगरसेवकपदासाठी 171 अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी (दि.21) उमेदवारी माघारीच्या दिवशीच मोठ्या राजकीय वेगवान हालचाली झाल्या.
त्यामुळे महायुती आणि महाआघाडी नेवाशामध्ये दुभंगलेल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीने सर्व जागेवर उमेदवार दिले असले तरी नगराध्यक्षपदासह प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन उमेदवार रिंगणात आहे. नेवाशात सतरा प्रभागांत प्रामुख्याने सेना-भाजप विरुद्ध क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा अशी तिरंगी लढत बहुसंख्य जागांवर होणार आहे.
निवडणूकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी सचिन कडू, तर प्रभाग 11, 12 च्या जागा सोडल्या आहेत. 17 पैकी 14 प्रभागातील उमेदवार पुरस्कृत करून 15 उमेदावार निवडणूक रिंगणात आहेत. अजितदादाची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत. तसेच इंदिरा काँग्रेसने फक्त नगराध्यक्ष पदासाठी अल्ताफ पठाण हा एकच उमेदवार दिला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शंकर लोखंडे, प्रभाग तीनमधील सचिन नागपुरे, प्रभाग चारमधील विवेक ननवरे ,प्रभाग पाचमधील निर्मला सांगळे, प्रभाग दहामधील निखिल जोशी आणि प्रभाग 15 मधील सुवर्णा नागपुरे ही उमेदवार न्यायालयात गेले आहेत.