नेवासा: जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या खुल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच येथून सुमारे तीस टन कांदा रविवारी कंटेनरद्वारे दुबईला रवाना करण्यात आला.
हरिओम एंटरप्राइजेसच्या वतीने दुबईला निघालेल्या कांद्याच्या पहिल्या कंटेनरचे पूजन नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरिओमचे अर्जुन पंडित व दीपक नाबदे, अर्जुन वाबळे यांच्या वतीने सभापती नंदकुमार पाटील, अरुण शिंदे, राजेंद्र सानप, सुनील धायजे, संभाजी धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
सभापती पाटील म्हणाले की माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा येथे खुले कांदा मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे, कांदा मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा उपलब्ध होत असल्याने परदेशातून त्याला चांगली मागणी होत आहे.
कांदा उत्पादकांनी नेवासा मार्केट कमिटीलाच आपला कांदा द्यावा, यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न आमचे संचालक मंडळ करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्जुन पंडित म्हणाले, की परदेशातून मागणी होत असल्याने आता प्रथमच या मार्केटमधून १२०० गोण्या म्हणजे सुमारे तीस टन कांदा येथून मुंबई व तेथून दुबईला जहाजाद्वारे रवाना होणार आहे.
रविवारीही कांदा खरेदी
नेवासा येथील मार्केट कमिटीच्या आवारात दि.६ मे पासून कांदा खरेदी सुरू करण्यात आली. दर मंगळवारी व गुरुवारी होणाऱ्या कांदा खरेदी विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता आता रविवारीही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असून आठवड्यात आता तीन दिवस खुली कांदा खरेदी राहणार असल्याचे सभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले.