

नगर: कोकणातील एकाला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने नगरजवळ बोलावून दागिन्यांसह ५२ लाखांची लूट करणाऱ्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अवघ्या तीन दिवसांत किनवट तालुक्यातून (जि. नांदेड) जेरबंद केले. त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम आणि कारसह २६.५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
शिवाजी ऊर्फ शिवा विठ्ठल मोहिते (वय ५२, रा. झेंडीगुळा लोणी (ता.किनवट), राजू ऊर्फ चंदू रामदास मोहिते (वय ३६, रा. सदर), अक्षय ऊर्फ आकाश रामदास मोहिते (वय २७, रा. मालठा, ता.हातगाव, जि.नांदेड), छगन दशरथ मोहिते (वय ३६, रा. याडी, ता. नेर, जि. यवतमाळ), दिनेश सुदाम जाधव (वय २४, रा.दगडवाडी, ता.हातगाव जि.नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
अविनाश अनिल नलावडे (रा. सणसवाडी, ता. मानगाव, जि. रायगड) यांना त्यांच्याकडे कामाला असलेल्या राजू मोहिते व अक्षय मोहिते (दोघे रा. नांदेड) यांनी वारंवार स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले. नलावडे यांना त्यांनी दि. ४ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नगरजवळ बुरुडगाव शिवारात रेल्वे उड्डाणपुलाजवळ बोलावले. तेथे नलावडे यांना त्यांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिना असा एकूण ५२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते निघून गेले. नलावडे यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना सूचना केल्या. त्यानुसार कबाडी यांनी तातडीने पथक तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केले. या पथकाने गुन्ह्यामधील व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपींची माहिती संकलित केली. त्यात आरोपी झेंडीगुळा लोणी (ता.किनवट, जि. नांदेड) येथे त्यांच्या घरी असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. पथकाने तत्काळ झेंडीगुळा लोणी गाठले आणि आरोपींच्या घरी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेसोळा लाख रुपये रोख, एक लाख ९० हजारांचे दागिने, आठ लाखांची कार, बनावट सोन्याची नाणी, कोयता असा २६.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करून त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सुनील पवार, फुरकान शेख, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कामगिरी केले.