Nevasa Unseasonal Rain Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Unseasonal Rain: नेवासात अवकाळी पावसाचा धोका; कांदा-गहू उत्पादक चिंतेत

काढणीच्या तोंडावर संकट; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे, कर्जमाफी निकषांवर संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविल्याने तालुक्यातील कांदाउत्पादक चिंतेत सापडले आहेत. तालुक्यात सध्या कांदा व गहू काढणीची जोरदार तयारी सुरू आहे. अवकाळी पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

गेल्या खरीप हंगामामध्ये ऐन सोयाबीन, मका काढणीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी यासह कांदा रोपांचेही मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीतून सावरत बळीराजा ने रब्बी हंगामातील गहू, कांदा, हरभरा आदी पिके मोठी आर्थिक गुंतवणूक करुन उभे केले आहे. तीन ते चार महिने बदलत्या हवामानाचा फटका अगोदरच या पिकांना बसलेला आहे. त्यात आता अवकाळी पावसाचे ढग दाटू लागले असून पाऊस झाल्यास शेती पिकांचे मोठे आर्थिख नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. हार्वेस्टरचे भावही वाढले.

सध्या तालुक्यातील बहुतांशी भागात मजुरांच्या टंचाईमुळे व पावसाच्या धास्तीने शेतकरी गहू पिकाची काढणी हार्वेस्टरच्या साह्याने करीत आहे. दुसरीकडे पडलेल्या दरामुळे अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरही संकटाचे ढग गडद झाले आहेत.

पाऊस झाल्यास कांदा पिकांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. अवकाळी पावसाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना काही शेतकरी करताना दिसत आहेत.

कर्जमाफीचे निकष जाहीर करा

दरम्यान, राज्य सरकारने संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यात नियमित शेतकऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. कर्जमाफीचे निकष जाहीर न केल्याने शेतकरी संभ्रमात दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT