

नगर: आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाई लक्षात घेऊन राज्य शासनाने केरोसीन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी 30 लाख लिटर केरोसीन मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. केरोसीन उपलब्ध झाल्यास प्रत्येक रेशनकार्डवर पाच लिटर केरोसीन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
युद्ध लांबले, तर एलपीजी गॅस सिलिंडरची कमतरता भासण्याची शक्यता गृहित धरून राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने स्वयंपाकासाठी केरोसीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सहा लाख पंधरा हजार रेशनकार्डधारक आहेत. प्रत्येक रेशनकार्डवर पाच लिटर यानुसार 30 लाख लिटर केरोसीन मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.
दरम्यान, ज्यांची केवायसी झालेली आहे, अशा नागरिकांची सिलिंडर मागणीसाठी बुकिंग होत आहे. अशा व्यक्तींना घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध होत आहे. अद्यापही 25 टक्के सिलिंडरधारकांची केवायसी झालेली नाही. त्यांनाघरगुती सिलिंडर उपलब्ध होत नाही. व्यावसायिक सिलिंडर सध्या उपलब्ध होतच नाही. त्यामुळे हॉटेले, रेस्टॉरंट, खानावळीधारक यांची तारांबळ उडाली आहे. व्यावसायिक सिलिंडर तुटवड्याचा फटका औद्योगिक क्षेत्रालादेखील बसला आहे.
चढ्या भावाने सिलिंडरची खरेदी
सिलिंडर नसल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळचालक चढ्या भावाने सिलिंडर घेत असल्याचे समजते. बहुतांश जणांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला. काही हॉटेलचालकांनी पदार्थांची संख्या कमी केली असून, काहींनी दरवाढही केली आहे.
सोमवारी 23,684 सिलिंडरचे वितरण
गॅस एजन्सींकडून सरासरी दररोज 24,800 घरगुती गॅस सिलिंडर वितरित केले जात आहेत. 16 मार्च रोजी 23,684 सिलिंडरचे वितरण करण्यात आले. यात भारत पेट्रोलियमच्या 12,703, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या 9600 आणि आयओसीएलच्या 1381 घरगुती गॅस सिलिंडरचा समावेश आहे.