

एकरूखे: राहाता शहरांमध्ये इंडियन गॅस अंतर्गत गॅस टाकी वाटपाचे काम सध्या सुरू आहे. परंतु गॅस वाटपासाठी सुरू असलेल्या रांगा काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शहरात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये गॅस टंचाईची समस्या कायम दिसत आहे.
आखाती देशातील युद्धामुळे ग्राहकांवर गॅस टंचाईची परिस्थिती ओढवली आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास राहाता शहरानजक पिंपळस आवारात इंडियन गॅस एजन्सी मार्फत देण्यात येणाऱ्या गॅस टाकण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड दिसून आली. दोन वाहनांमधून गॅस वाटप सुरू होते परंतु लांबच लांब दोन रांगा यावेळी पहावयास मिळाल्या. त्यामुळे येथील रस्त्यावरची वाहतूक कोंडी देखील झाली होती. गॅसची बुकिंग करणे, ओटीपी रजिस्ट्रेशन, केवायसी अशा भानगडीत ग्राहक चांगले संतापले दिसले.
राहाता तालुक्यात इंडियन गॅस आणि एचपी गॅस ह्या दोन एजन्सी काम पाहतात. परंतु गॅसचा पुरवठा पूर्णपणे होत नसल्यामुळे गॅस वाटप करत असताना कायमस्वरुपी रांगा पाहावयास मिळत आहे. तर गॅस टाकीचा काळाबाजार सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सोमवारी गॅस मिळत नसल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले परंतु मंगळवारी गॅस वाटप सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सुरुवातीला 21 दिवसांमध्ये बुकिंग होत होती परंतु त्यात वाढ होऊन ती आता गॅस टाकी वितरण झाल्यानंतर 25 दिवसांनी बुकिंग होत आहे. 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच गॅस टाकी मिळणार आहे.
दोन दिवसांपासून गाडी आली नव्हती. तालुक्यात गॅस ग्राहकांना मिळतो का नाही, याविषयी बोलणे चालू आहे. सध्या गॅस तुटवडा नाही. यामध्ये लोक घाबरलेले आहेत.
भारत खरात, पुरवठा अधिकारी, राहाता