Manish Ghadge Patil Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Secretary Death: नेवासा हादरवणारी घटना; प्रॉपर्टी वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान प्रकरणात संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर / नेवासा: त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनिष घाडगे यांच्या मृत्युला संस्थेतील प्रॉपर्टी वादाची पार्श्वभूमी असून त्यातून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी आणि प्राचार्यांच्या सततच्य मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुमती साहेबराव घाडगे, उपाध्यक्षा स्नेहल साहेबराव घाडगे, सहसचिव श्रृती साहेबराव घाडगे, प्राचार्य सोपान बाजीराव काळे, अनुराधा उत्तम गोरे हे कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

28 एप्रिल रोजी त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांनी स्वत:ला पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र त्यामागील कारण समोर आले नव्हते. 1 मे रोजी मनिष यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी मनिषा यांनी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गत वीस वर्षापासून मनिष घाडगे हे त्रिमूर्ती संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापक साहेबराव घाडगे यांचे 10 जून 2025 मध्ये निधन झाल्यापासून मनिष यांना त्रास देण्यास सुरूवात केली. संस्था ताब्यात घेण्याचा हेतू त्यामागे होता.

मनिष व त्यांच्या वडिलांच्या नावे असलेली वैयक्तिक मालमत्ता स्नेहल व श्रृती घाडगे यांच्या नावे करून द्यावी यासाठी विद्यमान अध्यक्ष सुमती घाडगे, उपाध्यक्षा स्नेहल घाडगे, सचिव श्रृती घाडगे यांनी प्राचार्य काळे व गोरे यांना हाताशी धरून बदनामी व खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले. कथित ठराव घेत मनिष यांच्या सचिव पदाचे अधिकार काढण्याचाही प्रयत्न झाला. त्या ठरावावर सही करण्यासाठी दबाव आणल्यानंतरही मनिष यांनी सही केली नाही. त्यामुळे कथित व्हिडीओ दाखवत बदनामीची धमकी दिली गेली. सततच्या धमक्या, मानसिक छळामुळे मनिष घाडगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

चिठ्ठीचा फोटो मोबाईल गॅलरीत

भाजलेले मनिष यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी पत्नीला मोबाईलमध्ये चिठ्ठी असल्याचे सांगितले. त्यानुसार पत्नीने पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलच्या गॅलरीत मनिष यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात सुमती घाडगे, स्नेहल घाडगे, श्रृती घाडगे, सोपान काळे, अनुराधा गोरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. संस्थेत मुले विश्वस्त राहतील, असाही उल्लेख असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मालत्ता नावे करण्यासाठी छळ

त्रिमूर्ती संस्थेच्या प्रॉपर्टी वादातूनच सचिव मनिष घाडगे यांनी आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सचिव पदाचा राजीनामा आणि वैयक्तिक मालमत्ता नावे करून घेण्यासाठी सुमती, स्नेहल आणि श्रृती यांनी छळ केल्याचेही आता समोर आले आहे. संस्था अंतर्गत वादात मनिष यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नेवासा तालुक्यात विविधांगी चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT