

अकोले: आखाती देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती कारणासाठी व्हावा, यासाठी शासनाने कडक निकष लावले आहेत. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरेसा पुरवठा नाही, अशी ओरड करीत आहेत. या टंचाईचा फटका आता नियोजित विवाह समारंभांनाही बसू लागला आहे.
अकोले तालुक्यात, ‘सिलिंडर तुम्हीच बघा,’ अशी आचारी पहिली अट टाकत असल्यामुळे वधू-वर पित्यांवर सिलिंडर नियोजनाचा नवाचा भार पडला आहे. यामुळे विवाह आयोजकांवर ‘कोणी सिलिंडर देते का, सिलिंडर?’ असे म्हणत शहरभर फिरण्याची वेळ ओढवली आहे. काहींनी घरातील तसेच नातेवाइकांकडून सिलिंडर आणून, सोहळा पार पडला आहे.
सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. मे व जून या दोन महिन्यांत जवळपास 20 मोठे विवाह मुहूर्त आहेत. विवाह जमलेल्या घरांमध्ये लगीनघाई सुरु आहे. कपडे, दागदागिने, भांडी, इतर संसारोपयोगी साहित्य, आहेर खरेदीत कुटुंब व्यस्त आहेत, मात्र दुसरीकडे नियोजनकर्त्या वधू-वर पित्यांपुढे एक नवेचं संकट ठाण मांडून बसले आहे.
जेवणाचा मेनू ठरवताना आता, गॅस सिलिंडरची व्यवस्था करण्याची आचारी मंडळी पहिली अट घालत आहेत. त्यामुळे सिलिंडर शोधण्याचे नवेचं काम वधू-वर पित्यांच्या पाठीशी लागले आहे.
सध्या अनेक गावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाप्रसादाच्या पंगतीही नियोजित असतात, मात्र महाप्रसाद बनवण्यासाठी गॅस सिलिंडरचं यंदा बहुतांश ठिकाणी उपलब्ध झाले नाहीत. यामुळे अशा ठिकाणी चुली मांडून, महाप्रसाद शिजवावा लागल्याचे चित्र दिसत आहे.
‘घरगुती’वालेही वळले’ व्यावसायिकते’कडे
काही हॉटेल किंवा ढाबाचालक तसेच हातगाड्यांवरील व्यावसायिक बंदी असतानाही घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक कारणासाठी वापरतात. पूर्वी यावर कारवाई होत नसल्यामुळे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु होते, मात्र आता कडक नियम लागू झाल्यामुळे थेट कारवाई होत आहे. तसेच त्यांच्याकडूनही व्यावसायिक सिलिंडरची मागणी वाढली आहे. यामुळे टंचाईत आणखी भर पडली आहे.
मंगल कार्यालयात चुली नको
हल्ली बहुतांश विवाह सोहळे मंगल कार्यालयातचं पार पडतात. मार्च- एप्रिल महिन्यात अशी लग्नकार्य पार पडली, मात्र मंगल कार्यालय चालकांनी चुल मांडण्यास स्पष्ट नकार देत, स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर किंवा स्टोव्ह वापरण्याची सक्ती केली आहे.