Village Security Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Theft News: नेवासा परिसरात चोरट्यांची दहशत; वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांचा जागता पहारा

चार चोरीच्या घटनांनंतर चोरट्यांचा पुन्हा वावर; बिबट्यांचीही भीती, रात्रीच्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: रात्रीच्या अंधारात चोरट्यांचा वावर दिसला... नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले...आणि त्यानंतर वाड्या-वस्त्यांवर सुरू झाला जागता पहारा नेवासा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर सुरू झाला आहे. चोरीच्या चार घटना घडल्यानंतर बुधवारी रात्री चोरट्यांचा प्रत्यक्ष वावर दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री नेवासा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अनेकांनी रात्र जागून काढली. तरूण वर्ग रात्रीचा जागता पहारा करीत आहेत.

रानमळा,उस्थळ रोड,नारायणवाडी रोड,माळीवस्ती तसेच खुपटी रस्त्यावरील नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. बुधवारी रात्री चोरट्यांचा वावर दिसला आणि त्याचवेळी सिंगल फेज वीजपुरवठ्याचे तातडीने भारनियमन सुरू असल्याने परिसर अंधारात बुडाला होता.त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण झाली.

शहर व उपनगरातील चोरीच्या घटनांना आठ दिवस होत आले आहेत. मात्र, पोलिसांच्या तपास पथकाला अद्याप ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. त्यातच चोरट्यांचा प्रत्यक्ष वावर दिसल्याने पुढचा निशाणा कोण? या प्रश्नाने वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची झोप उडाली आहे.

दरम्यान,उस्थळ दुमाला रस्ता परिसरात काही दिवसांपूर्वी दोन बिबटे दिसल्याने चोरट्यांसोबत बिबट्यांचीही भीती नागरिकांना सतावत आहे. रात्रीच्या वेळी भारनियमन करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उस्थळ दुमाला रस्ता, खुपटी स्ता, खडका, नेवासा फाटा, देवगड रस्ता चोरटे आल्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी भीतीयुक्त रात्र जागून काढली.

चोरट्याची खबर मोबाईलवर

नारायणवाडी रस्त्यावरील तरुणांनी नागरिकांना तातडीने सतर्क करता यावे, यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. प्रत्येक घरातील तरुणाचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. रात्री चोरट्यांचा वावर दिसताच ग्रुप कॉल सुरू ठेवून तरुण एकमेकांच्या संपर्कात राहिले.

नागरिक तिहेरी संकटात

उस्थळ रस्ता परिसरात काही दिवसांपूर्वी दोन बिबटे दिसले आहेत.त्यामुळे रात्री शेतात जाणे,जनावरांची देखभाल करणे किंवा वीज गेल्यानंतर घराबाहेर पडणे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. एका बाजूला चोरट्यांचा प्रत्यक्ष वावर,दुसऱ्या बाजूला बिबट्यांचा धोका आणि त्यात रात्रीचा अंधार; वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसाठी परिस्थिती गंभीर बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT