

नेवासा: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून तलवार, बंदूक, कोयता, चाकू, कुऱ्हाड व दांडक्याने तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या गोळीबारात तो जखमी झाला. नेवासा तालुक्यातील साईनाथनगर (नागफणी) येथे शनिवारी पहाटे हा थरार घडला. नेवासा पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पाच जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. जखमी रमेश भोसलेवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण भानुदास चव्हाण, कुणाल कल्याण चव्हाण, अभिषेक उर्फ अभी कल्याण चव्हाण, गणेश उर्फ गण्या कल्याण चव्हाण, हरण कल्याण चव्हाण, कोमल रोहित काळे, रोहित काळे, पूजा परसिंग भोसले (सर्व रा. देवगड फाटा, नेवासा), उमेश हारसिंग भोसले( रा.जोगेश्वरी,गंगापूर), आकाश गौतम चव्हाण (रा.वाळुंज, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पाच जणांना नेवासा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत.
रमेश छगन भोसले असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी सपना शहाराम भोसले यांनी फिर्याद दिली आहे. ‘पोलिसांचा खबऱ्या होतो का, पोलिसांना आमच्या खबऱ्या देतो का’, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
अभिषेक चव्हाण याने गावठी कट्ट्यातून रमेश भोसलेच्या पाठीवर गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासारख्याच इतरांना गोळ्या घालून संपून टाकू, अशी धमकी दिली. अन्य आरोपींनी तलवार, कोयता, चाकू, कुऱ्हाड व लाकडी दांडक्याने जीव मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
एसपी ऑन द स्पॉट
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. तपासाच्या सुचना केल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक आरोपीच्या मागावर रवाना झाले. या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणावरून पाच जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.