Police Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Encroachment Dispute: नेवासा शहरात तणाव; अतिक्रमणाच्या वादातून वाहनाची तोडफोड, पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली

जमावाला पांगवत पोलिसांनी वाहन सुरक्षित बाहेर काढले; पोलिस कर्मचारी जखमी, बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: नेवासा शहरातील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणाच्या वादातून गुरुवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फळ विक्रेते आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यात झालेल्या वादानंतर जमावाने वाहनाची तोडफोड केली. शहरात तणाव पूर्व परिस्थिती निर्माण होत असतानाच नेवासा पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली.

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत फक्त दहा पो्लिस कर्मचाऱ्यांच्या बळावर शेटे यांच्या वाहनांला मोठ्या कसोटीने सुरक्षित बाहेर काढत संतप्त जमावाला पांगवले. संबंधितांना वेळ प्रसंगी बळाचा वापर करत त्यांनी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. यावेळी जमावात अडकलेले वाहन बाहेर काढत असतांना पोलिस कर्मचारी राहुल नरवडे यांच्या पायावरून वाहन गेल्याने पायाच्या बोटाला मोठी जखम झाली. तसेच एक होमगार्ड जवान देखील किरकोळ जखमी झाले आहेत. तरीही पोलिसांनी न डगमगता आपले कर्तव्य पार पाडले.

पोलिस निरीक्षक दराडे यांच्या या धाडसी आणि समयसूचकता निर्णयामुळेच शहराची शांतता अबाधित राहिली. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर कारवाई, आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पो.नि. दराडे यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद ठरत आहे.

व्यापाऱ्यांकडून समाधान!

यापूर्वी अशा घटनांनंतर शहरातील बाजारपेठ बंद ठेवावी लागत होती, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र यावेळी पोलिसांनी परिस्थिती इतक्या चांगल्या प्रकारे हाताळली की, एकही दुकान बंद ठेवावे लागले नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहिले. त्यामुळे व्यापारी वर्गातून पोलीस निरीक्षक दराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

सदरील घटना आम्ही गांभीर्याने घेत गुन्हे दाखल करून संबधित आरोपींना अटक केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसारच कारवाई केली जात आहे.
प्रताप दराडे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT