Nevasa Ashadhi Wari Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Ashadhi Wari: ज्ञानोबांच्या पुण्यभूमीतून आषाढी वारीला जल्लोषात प्रारंभ; नेवासाहून 'पैस' खांब पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू-आळंदीच्या धर्तीवर दुसऱ्या वर्षी भव्य पायी दिंडी; ३० हून अधिक दिंड्यांचा सहभाग, रिंगण सोहळा व फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिमय वातावरण

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: देहू-आळंदीच्या धर्तीवर नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज ‘पैस’ खांब मंदिर देवस्थानच्या वतीने एकत्रित काढण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे बुधवारी (दि.८) वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी करत चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात माऊलींच्या पुण्यभूमीत दिंडीतील पहिला रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या पायी दिंडी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.

बुधवारी सकाळी ‘पैस’ खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून देविदास महाराज म्हस्के, भास्करगिरी महाराज, रामभाऊ राऊत महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार विठ्ठलराव लंघे, रत्नमाला लंघे, महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार नरेंद्र घुले, बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख, ‘पंचगंगा’चे प्रभाकर शिंदे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, उदयन गडाख, डॉ. अविनाश काळे, संजय सुखदान आदी उपस्थित होते.

या पालखी सोहळ्यात ३० ते ३२ दिंड्यांचा सहभाग आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून दिंडी सोहळयास प्रारंभ करण्यात आला. दिंडीचे नेवासा नगरीत फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत चौकाचौकात स्वागत करण्यात आले. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह व्यापारी भाविक यांनी देवस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के यांचे पूजन करत पालखीचे दर्शन घेतले.

यावेळी निघालेल्या दिंडीत रामकृष्ण आश्रमाचे गोणेगाव चौफुला येथील महंत भगवान महाराज जंगले शास्त्री, अंकुश महाराज जगताप, नंदकिशोर महाराज खरात, रामकृष्ण महाराज काळे, विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, कृष्णा महाराज हारदे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, विजय महाराज पवार, विष्णुपंत महाराज ठोसर, ज्ञानेश्वर कारखाना संचालक अमोल अभंग, मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, श्रीरंग हारदे, अशोक हारदे, बाळासाहेब गोरे, बाबासाहेब भगत, माजी सभापती देविदास साळुंके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.

पाथरवाला येथील बाळासाहेब खाटीक व सहकारी व भगूर (जि. नाशिक) येथील संगीता वाकचौरे, सुनीता निकम यांनी बसस्थानकावर रांगोळी रिंगण काढले होते. दिंडीमार्गात पंढरपूरपर्यंत ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात येणार आहे.

दिंडीचे नेवासा येथील एस.टी.च्या प्रांगणात अश्व व वारकऱ्यांचे रिंगण पार पडले. प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, मोहन गायकवाड व सहकारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. एस टी महामंडळाचे आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांच्यासह एस टी कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

या दिंडी सोहळयाच्या स्वागत प्रसंगी तहसीलदार डॉ संजय बिरादार, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, इंजि. सुनीलराव वाघ, प्रताप चिंधे, ऋषिकेश शेटे, भाऊसाहेब आगळे, भैय्या कावरे, निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक सर्वपक्षीय पदाधिकारी, नेवासकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT