Onion Market Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Onion Market: नेवासा कांदा मार्केटची ७.५० कोटींची उलाढाल; तीन महिन्यांत ६० हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक

खुल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दुबईपर्यंत कांदा निर्यात, श्रीरामपुरात गावरान कांद्याला ३,००० रुपये प्रतिक्विंटल भाव

पुढारी वृत्तसेवा

कैलास शिंदे

नेवासा: नेवासा बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या खुला कांदा मार्केटमध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत ६६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, सुमारे ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिली.

नेवासा आवारामध्ये दि. ६ मेपासून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नियोजनाखाली खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आले. मार्केट सुरू झाल्यावर अगोदर दर मंगळवारी व गुरुवारी खुला कांदा मार्केट सुरू करण्यात आले. त्यानंतर कांदा उत्पादकांची मागणी लक्षात घेता रविवारीही मार्केट सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळातर्फे घेण्यात आला. त्यास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व आजपर्यंत मिळत आहे.

मे ते जुलै अशा तीन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत एकूण ३ हजार ९२४ वाहनांची नोंद झाली. मे महिन्यात १९ हजार ३८७ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात १ कोटी ४२ लाख २९ हजार ९११ रुपयांची उलाढाल झाली. जूनमध्ये २६ हजार ५५९ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये ३ कोटी २१ लाख ६२ हजार ८९ रुपयांची उलाढाल झाली. जुलैमध्ये २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३१२ रुपयांची उलाढाल झाली.

आतापर्यंत समितीच्या आवारात तीन महिन्यांत ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, त्यामध्ये एकूण ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. येथे खुला कांद्याचा लिलाव झाल्यानंतर लगेच रोख पेमेंट केले जाते. कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त दर त्याच बरोबर सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी समिती संचालक मंडळ हे प्रयत्न करत असून, माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वेळोवेळी होत असलेल्या मार्गदर्शनामुळे नेवासा कांदा मार्केट आता राज्यासह परदेशात प्रसिद्ध होऊ लागल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

परदेशातही मागणी

मंगळवार, गुरुवारसह आता रविवारीही कांदा मार्केट सुरू करण्यात आल्याने कांदा उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मार्केटमध्ये उच्च प्रतीचा कांदा नेवासा आवारात उपलब्ध होत असल्याने येथून दुबई येथेही कांदा निर्यात केला गेला. त्यामुळे नेवासा मार्केट कमिटीच्या कांद्याला परदेशातही मागणी होऊ लागली आहे.

रविवारी मार्केट बंद!

नेवासा येथे रविवारी (दि. ९) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कामिका एकादशीला मोठी यात्रा भरत असल्याने नेवासा मार्केट समितीमधील रविवारचा होणारा खुला कांदा लिलाव होणार नाही. मार्केट या दिवशी बंद राहणार असल्याने कांदाउत्पादकांनी या दिवशी कांदा मार्केटला आणू नये, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले आहे.

श्रीरामपुरात गावरान कांद्याला ३००० रुपये क्विंटलचा भाव

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी गावरान कांद्याची आवक वाढली असून भावही स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावरान कांद्याला ३००० रुपये क्विंटल भाव जाहीर झाला असून, आवक २७०४८ गोण्यांची आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व प्र. सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली. कांद्याला सोमवारी मिळालेले भाव रुपयांत असे ः नंबर एक - २२०० ते ३०००, नंबर दोन - १६०० ते २१५०, नंबर तीन - ८०० ते १५५०, गोल्टी - १००० ते २०००, खाद - २०० ते ७५०.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT