कैलास शिंदे
नेवासा: तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पावसावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. यंदा पाऊस वेळेवर आल्याने काहीच अडचण येणार नाही. अशीच सर्वांची अपेक्षा असतानाच सध्या तालुक्यातील बर्याच भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पाऊस लांबल्याने तालुक्यात 33 हजार हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशी पिकांचे भवितव्य धूसर बनू पाहत आहे. रोजच येणार्या ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांचे आकाशाकडे लक्ष लागून आहे. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यामध्ये जूनच्या प्रारंभी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा पाऊस वेळेवर आला आहे. शेतकर्यांनी खरिपाची तयारीही दमदारपणे करून बी-बियाणे उपलब्ध केले. याच जोरदार पावसावरच खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या.
आता महिनाअखेर होत आला, तरी तालुक्यातील बर्याच भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांना धडकी भरली आहे. आज, उद्या पाऊस हमखास येईल या आशेवरच शेतकरी सध्या जगताना दिसत आहे. दररोज आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पाऊस मात्र पडत नसल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढत आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकर्यांनी कपाशी, सोयाबीन, मका, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी केली आहे. काही दिवस पाऊस थांबल्याने शेतकर्यांनी कपाशी पिकांमध्ये बैलाच्या सहाय्याने तिपडेलेले आहे. तर छोट्या ट्रॅक्टरने रोटा मारून तण काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सध्या कपाशीमधील आळे खुरपणी काम होत आहे. या खुरपणीमुळे जमिनीतील ओल कमी होत असल्याने पावसाची नितांत गरज आहे.
परंतु मोठ्या प्रमाणात पावसाच्या कालखंडामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण आता पिके उगवून दोन-चार पाने वरती आलेली असून, त्यांना आता खत देण्यासाठी पावसाची गरज आहे. परंतु पाऊस नसल्यामुळे पिकांना शेतकर्यांना खते टाकणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजाची चिंता वाढल्याचे चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
शेतकरी वर्ग पाऊस पडल्यानंतर लागवडीची मोठी लगबग करताना दिसत असतो, तसेच पेरणीसाठी मेहनतीसाठी कर्ज काढून आपल्या शेतामध्ये पीक खुलवण्यासाठी धडपड करत असतो. परंतु पावसाने अशा प्रकारे हुलकावणी दिल्याने शेतकरी हिरमुसल्यासारखा सध्याच्या काळामध्ये पहावयास मिळत आहे.
यंदा पाऊस वेळेवर झाल्याने कपाशीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. काही दिवस पावसाने विश्रांती दिल्याने कपाशी खुरपणीची कामे जोमात सुरू आहे. कपाशी व अन्य पिके सुकू लागली आहेत. काहींची खुरपणी होऊन जमीन सुकल्याने आता पावसाची गरज आहे.- सचिन जाधव, शेतकरी, गोंडेगाव