सोनई : नेवासा न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासस्थानाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, या मंजूर कामाचे भूमिपूजन रविवारी (दि.8) नेवासा न्यायालय परिसरात होणार आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे नेवाशाचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी 2020 मध्ये नेवासा येथे नवीन न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासस्थानाच्या बांधकामासाठी 60 कोटी 62 लाख रुपयांच्या निधीच्या मागणीचे पत्र दिले होते. न्यायालयीन इमारतीसाठी 54 कोटी 6 लाख तर न्यायाधीश निवासस्थानासाठी 6 कोटी 62 लाख रुपयांचा समावेश पत्रात करण्यात आला होता.
2022/23 च्या अर्थसंकल्पात या कामासाठी निधीची तरतूद व्हावी यासाठी सातत्याने शंकरराव गडाख यांनी पाठपुरावा केला. उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ऑगस्ट 2021 मध्ये न्यायाधीश निवासस्थानासाठी 5.91 कोटी, तर नोव्हेंबर 2022 मध्ये न्यायालयीन इमारतीसाठी 37.57 कोटी रुपये असा 43.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 2024/25 मध्ये या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मूळ इस्टीमेटमध्ये काही दुरुस्त्या व सूचना केल्याने हा प्रस्ताव काही काळ प्रलांबित राहिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुधारित प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला.
फेब्रुवारी 2025 मध्ये या कामासाठी 50 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत सर्वेक्षण, इस्टीमेट, प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतः लक्ष घालत सातत्याने पाठपुरावा केल्याचे समर्थकांचा दावा आहे. गडाख यांनी केलेल्या पाठपुराव्याचे पत्रही त्यांनी माध्यमांना दिले आहे.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे नेवासा येथे न्यायालयीन इमारत व न्यायाधीश निवासस्थानासाठी निधी उपलब्ध झाला असून, या कामामुळे न्यायालयीन सुविधांचा दर्जा उंचावणार आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास जाऊन नागरिकांना न्यायव्यवस्थेच्या अधिक सुलभ सुविधा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नेवासा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीचा कोनशिला अनावरण व उद्घाटन रविवारी माहिती नेवासा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजय रिंधे व उपाध्यक्ष ॲड. सुदाम ठुबे यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते व न्यायमूर्ती रोहित जोशी व अहिल्यानगरचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी दिली.