नेवासा: नगर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवरासंगम येथील पुलावर शनिवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास एका कारला अचानक आग लागून ती जळून खाक झाली. मात्र, या दुर्घटनेहून धक्कादायक बाब म्हणजे, महामार्गावरील प्रवरासंगम पोलिस चौकी यावेळी चक्क कुलूपबंद होती. मदतीसाठी वारंवार संपर्क करूनही पोलिस यंत्रणेचा प्रतिसाद न मिळाल्याने महामार्ग सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.
अहिल्यानगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या या कारने पेट घेताच कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या घेतल्या. ज्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आपत्कालीन मदतीसाठी उभारलेली पोलिस चौकीच बंद असल्याने नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. महामार्ग सुरक्षा पथकही घटनास्थळी फिरकले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पोलिस, टोल प्रशासन आणि अग्निशमन यंत्रणा यांच्यात समन्वयाचा अभाव या घटनेत प्रकर्षाने दिसून आला. धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर तब्बल चार तासांनी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण कार जळून तिचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. आग विझवणे किंवा वाहतूक नियंत्रित करणे यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा वेळेत कार्यरत झाली नाही.
प्रवाशांकडून नियमित टोल वसूल करणाऱ्या प्रशासनाकडे प्राथमिक अग्निशमन साधने किंवा तातडीची मदत उपलब्ध नसल्याने टोल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांत मदत मिळाली असती, तर वाहनाचे नुकसान टळले असते; मात्र यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे ती संधी हुकली.
संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पुलावर वाहनाचा स्फोट झाला असता, तर इतर वाहनांसह पुलालाही मोठा धोका निर्माण झाला असता. ही घटना पोलिस, टोल प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या या सामूहिक हलगर्जीपणाची आहे. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.