Nevasa Accused Welcome Rally Pudhari
अहिल्यानगर

Nevasa Accused Welcome Rally: शिक्षा माफ झालेल्या आरोपीच्या स्वागतासाठी जमाव; पोलिसांची कारवाई, ५९ लाखांची वाहने जप्त

नेवासा फाट्यावर महामार्ग रोखून रॅली, फटाके फोडून गोंधळ; चौघे पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नेवासा: शिक्षा भोगल्यानंतर राहिलेली शिक्षा माफ झाल्याने सुटलेल्या आरोपीच्या स्वागतासाठी नेवासा फाट्यावर जमलेल्या बेकायदेशीर समर्थकांच्या जमावावर नेवासा पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेऊन जेसीबीसह चारचाकी, दुचाकी अशी ५९ लाखांची वाहने जप्त केली. बेकायदेशीर जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादंवि कलम ३०२, ३०७ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी नितीन प्रमोद केंदळे याची उर्वरित शिक्षा माफ झाल्याने त्याच्या समर्थकांनी दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राज्य महामार्गावर त्याचे भव्य स्वागत केले.

रॅली काढून रहदारीस अडथळा निर्माण करून रस्ता अडविला. ही माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे घटनास्थळी गेले असता महामार्गावर ५ ते ६ चारचाकी वाहने व १० ते १२ मोटारसायकली व जेसीबी अशी वाहने रोडला रहदारीस अडथळा होईल अशा प्रकार उभी करून फटाके फोडून गोंधळ घातला जात होता.

दरम्यान, पोलिस आल्याचे पाहून नितीन केंदळे तेथून पळून गेला. त्याचे समर्थकही पळू लागले. त्यातील किशोर राजेंद्र डौले (वय २७, रा. नेवासा बुद्रुक), शिवानंद अरविंद ढेपे (वय ३७, रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर), बादल कैलास परदेशी (रा. नेवासा फाटा), वसिम आलमगीर शेख (रा. नेवासा फाटा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

रहदारीस अडथळा निर्माण करण्यासाठी वापरलेली २० लाख रुपये किंमतीच्या दोन स्कार्पिओ, ९ लाख रुपये किंमतीची कार व एक ३० लाख रुपये किंमतीचा जेसीबी असे एकूण ५९ लाख रुपयांची वाहने ताब्यात घेतली आहेत. बेकायदेशीर जमावावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT