Nashik Pune Railway Protest Pudhari
अहिल्यानगर

Nashik Pune Railway Protest: नाशिक पुणे रेल्वेसाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय एल्गार; सरळ मार्गावरूनच रेल्वेची मागणी

बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन; सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंना अटक, महाजनांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर-संगमनेर मूळ मार्गावरूनच गेली पाहिजे, यासाठी काल रविवारी (दि.९) माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हिवरगाव पावसा टोल नाका येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रेल्वे आमच्या हक्काची’, रेल्वे सरळ मार्गेच झाली पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सिन्नर येथे समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे यांनी रास्तारोको आंदोलन केले असता, त्यांना सिन्नर पोलिसांनी अटक केल्याने आंदोलक तीव्र झाले होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन तूर्त थांबवण्यात आले.

काही वर्षापूर्वीच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्यावेळी हा मार्ग सिन्नर संगमनेर आळेफाटा खेड, मंचर, नारायणगाव, चाकण असा होता. जमीन अधिकृत करून नागरिकांना मोबदला देण्यात आला‌. मात्र नंतर हा मार्ग बदलण्यात आला. शिवाय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक-पुणे जुना मार्ग रद्द झाल्याचे जाहीर केले. यामुळे मोठा रोष निर्माण झाला. या विरोधात जनभावना तीव्र झाल्याने नागरीकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता एकाच वेळी सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिवरगाव पावसात टोल नाका येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, पद्मश्री रघुवीर खेडकर, दुर्गाताई तांबे, प्रा हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, छात्र भारतीचे अनिकेत घुले, डॉ. कोल्हे, अमर कतारी, विश्वासराव मुर्तडक, सिताराम राऊत, उत्कर्षाताई रूपवते, अजय फटांगरे, शरद थोरात, सोमेश्वर दिवटे आदी सहभागी झाले आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक - पुणे सरळ रेल्वे करता आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2019 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर स्व. अजित पवार यांनीही यामध्ये मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार, रेल्वे या सर्व विभागांच्या या ‘सरळ’ मार्गासाठी मान्यता मिळालेले आहेत. राज्य सरकारने 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले, त्यानंतर भूसंपादन सुरू झाले. गोल्डन ट्रँगलसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे काय कारण आहे, ते कळत नाही.

या अत्यंत चांगल्या कामात कुणी खोडा घातला, हा सवाल करताना सर्व मंजुऱ्या मिळताना जीएमआरडीची कोणतीही अडचण आली नव्हती. आताच अडचण आली कशी, असा प्रश्न करत, जेथून रेल्वेचे काम थांबले, तेथूनच काम सुरू करा, अशी मागणी केली.

आ.सत्यजित तांबेंना अटक

सिन्नर येथे समृद्धी महामार्गावर आमदार सत्यजित तांबे समर्थकांसह रास्ता रोको आंदोलन करत होते. या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलकांची वाढती गर्दी व वाहतूक विस्कळीत झाल्याने सिन्नर पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना अटक केली. त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले काही काळ थांबवल्या नंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी आ. सत्यजित तांबेंशी फोनव्दारे संवाद साधला. यावेळी आ.तांबे यांनी समितीला ६० दिवसांची मुदतच पुरेशी असून यानंतर कुठली मुदतवाढ देऊ नये व नाशिक-पुणे रेल्वे साठी गावोगावी नागरिकांशी संवाद साधावा, अशी मागणी केली, ही मागणी मान्य केल्याचे महाजन यांनी सांगितल्याने आंदोलन तूर्त थांबले.

‘चांगल्या कामात राजकारण करू नका’

शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या प्रति आम्हाला आदर आहे. परंतु समिती नेमून पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार आहे. साईबाबा हे नेहमीच चांगल्या कामासाठी आशीर्वाद देतात. त्यामुळे चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये. काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलीकडे जात नाही, अशी नाव न घेता आ. खताळ यांच्यावरही थोरातांनी टीका केली.

नाशिक - पुणे सरळ रेल्वे हे स्वर्गीय अजित दादांचे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही आता लक्ष दिले पाहिजे. या रेल्वेमुळे शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, युवक यांना भविष्यात मोठी संधी मिळणार असून, हा लढा साईबाबांच्या श्रद्धा, सबुरी अन सत्याचा आहे.
डॉ.जयश्री थोरात
नाशिक - पुणे सरळ रेल्वे मार्ग हा नैसर्गिक आहे मात्र संगमनेर तालुक्याचा विकास थांबवण्यासाठी काही मंडळींनी जाणीवपूर्वक या मार्गामध्ये बदल केला आहे. संगमनेरचे नवे लोकप्रतिनिधी संगमनेरच्या बाजूने कधी बोलत नाहीत. हा लढा भविष्यातील पिढ्यांसाठी असून सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
डॉ.सुधीर तांबे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT