नगर: नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी चेअरमन, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि काही मोठ्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा शासनाचा निर्णय घेतला आहे. सुमारे 72 मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत, अशी बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, ॲड. अच्युत पिंगळे, डी. एम. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समितीने सांगितले की, आतापर्यंत ठेवीदारांना सुमारे 70 टक्के रक्कम परत मिळाली आहे. उर्वरित 30 टक्क्यांपैकी 15 टक्के रक्कम एप्रिल 2024 मध्ये देण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित 15 टक्क्यांसाठीही लढा सुरू राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 18 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढून संबंधित आरोपी, संचालक, अधिकारी व काही कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त करण्यात येणाऱ्या मालमत्तांची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. या कारवाईतून ठेवीदारांचे पैसे, व्याज, बँकेचा निधी, सभासदांचा लाभांश तसेच कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होणार आहे.
तसेच, संबंधित आरोपींकडून मालमत्ता विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बँक बचाव समितीच्या प्रयत्नांमुळे ठेवीदारांना न्याय मिळत असून, 114 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बँक बचाव समितीने दिली.
यांच्या मालमत्ता सील होणार
आरोपी सुरेश शिवराम सातपुते, रमेश शिवराम सातपुते, मनोज वसुमल मोतियानी, केशव भाऊसाहेब काळे, विनोदकुमार अण्णासाहेब श्रीखंडे, अनिल चंदुलाल कोठारी, महादेव पंढरीनाथ साळवे, अजय अमृतलाल बोरा, रवींद्र विठ्ठल कडूस, सतीश विठ्ठल रोकडे, मनेष दशरथ साठे, गिरीश केदारनाथ लाहोटी, राजेंद्र केशवराव डोळे, नवनीत शांतीलाल सुपरिया, प्रगती देवेंद्र गांधी, सरोज दिलीप गांधी, शैलेश सुरेश मुनोत, राखी शैलेश मुनोत, दिनेश पोपटलाल कटारिया, अक्षय राजेंद्र लुनावत, केदार मुरलीधर लोहाटी, शिवदास दिलीप गायकवाड, शितल शिवदास गायकवाड, सचिन दिलीप गायकवाड, दीप्ती सुरेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सुवेंद्र दिलीप गांधी, संदीप ईश्वरदार वाघमारे, रवींद्र विठ्ठल जेजुरकर, अशोकलाल माधवलाल कटारिया, राजेंद्र बहिरू म्हस्के या आरोपींची मालमत्ता सील होणार असून, त्यांच्याशी कोणीही जमिनीचा व पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन बँक बचाव समितीने केले आहे.