Water Master Plan Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Master Plan: नगर तालुक्यासाठी अजितदादांचा जलमास्टर प्लॅन; शेतकऱ्यांना दिलासा देणारी संकल्पना

मुळा धरणाच्या पाण्यावर आधारित बारमाही सिंचनाचा आराखडा आजही प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: नगर तालुका पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांशी नागरिकांची उपजीविका शेती व शेतीवर आधारित व्यवसायांवरच अवलंबून आहे. तालुक्यातील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने येथील शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतात हे वास्तव आहे. या बाबीचा बारकाईने अभ्यास करून स्व. अजितदादा पवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‌‘मास्टर प्लॅन‌’ तयार केला होता.

अजितदादा यांनी मुळा धरणाचे पाणी पिंपळगाव माळवी तलाव व परिसरातील लहान मोठे तलाव, बंधारे, नाल्यांमध्ये आणून शेतकरी हिताचा प्लॅन तयार केला होता. शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर परिवर्तन यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेचा समारोप तात्कालीन स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यात जेऊर येथे करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्ष नेते स्व. अजित दादा पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे, निलेश लंके, उषाताई तनपुरे, प्राजक्त तनपुरे, स्व. शिवाजी गाडे, गोविंद मोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. परिणामी त्या निवडणुकीत स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाला तर प्राजक्त तनपुरे प्रथमच विधानसभेत पोहोचले.

21 ऑक्टोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बरच्या घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या सरकारमध्ये पुन्हा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. जेऊर येथे झालेल्या जाहीर सभेत अजितदादा पवार यांनी मुळा धरणाचे पाणी वांबोरी चारीच्या माध्यमातून पिंपळगाव माळवी तलावात तसेच परिसरातील इतर लहान-मोठे, तलाव भरण्यासाठी योजनेची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली होती. त्या घटनेला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून ती अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. ही खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पक्षविरहित विकास कामांवर चर्चा !

अजितदादा पवार जेऊर येथे परिवर्तन यात्रेच्या समारोपाला आले असता त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे व माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या घरी स्नेहभोजन केले. यावेळी त्यांनी विविध विकास कामांवर पक्षविरहित, गट तट बाजूला ठेवून मनमोकळा संवाद साधला. याचीही आठवण अजित दादांच्या निधनाने जेऊरवासीयांना होत आहे.

असा होता ‌‘मास्टर प्लॅन‌’ !

मुळा धरणातील पाणी चापेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, जेऊर, ससेवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा गड, पिंपळगाव उज्जैनी या गावांच्या डोंगर माथ्यावरून पिंपळगाव तलावात सोडायचे. त्यामुळे परिसरातील सर्व तलाव, बंधारे तुडुंब भरतील. तसेच, पिंपळगाव तलावातून खालील गावांना पाणी सोडायचे. पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ‌‘रिसायकल‌’ पद्धतीने पुन्हा तेच पाणी वरील गावांच्या डोंगर माथ्यावर सोडायचे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध होणार असा प्लॅन होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT