Water Tanker Pudhari
अहिल्यानगर

Nagar Taluka Rain Deficit: नगर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम; खरीप पिकांवर दुबार पेरणीचे संकट, 19 गावे टँकरवर

अल्प पावसामुळे बाजरी-सोयाबीन धोक्यात; ऐन पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून गावे

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: जुलै महिना सुरू झाला तरी नगर तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या तुरळक सरींनी काही काळ आशा निर्माण केली होती. त्या अल्प पावसावर विश्वास ठेवून काही शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन व इतर खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरिवल्याने पेरणी केलेल्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणीच केलेली नसून ते चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत.

तालुक्यात मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांनी बाजरी आणि सोयाबीनकडे मोर्चा वळविला आहे. परंतु या पिकांनाही तातडीने पावसाची गरज असून, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, मशागत, बियाणे, खतांचा खर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन पावसाळ्यात नगर तालुक्यातील तब्बल १९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. जुलै महिना सुरू होऊनही टँकरची संख्या वाढत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे. नव्याने चिचोंडी पाटील व मांडवे गावासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. एका बाजूला शेती कोमेजत आहे तर दुसऱ्या बाजूला गावागावांत पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. पावसाळ्यातही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने ग्रामीण भागात विदारक चित्र तयार झाले आहे.

हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त होत असला तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला, तरच खरीप हंगामातील पेरण्या होतील. तसेच पेरण्या झालेल्या पिकांना नवसंजीवनी मिळेल. अन्यथा पेरण्या, पिके आणि पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होणार असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

पावसाळ्यात टॅंकरचे पाणी पिणारी गावे

इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मदडगाव, रांजणी, अकोळनेर, खांडके, भोयरेपठार, बाळेवाडी, भोयरे खुर्द, उक्कडगाव, कोल्हेवाडी, सांडवे, भातोडी, पारगाव, बाबुर्डी, जेऊर, मांडवे व चिचोंडी पाटील.

इमामपूर येथे एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली आहे. परंतु पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तर उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच भूजल पातळीत वाढ झाली नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.
बाजीराव आवारे,प्रशासक, इमामपूर
दोन एकर बाजरी व सोयाबीनची पेरणी आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पावसावर केली आहे. परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलै उजाडला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. भूजल पातळीत वाढ झालेली नाही. खरीप हंगाम तसेच रब्बी हंगामाबाबत बळीराजांचा जीव टांगणीला आला आहे.
सूरज तोडमल, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT