शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये नगर तालुका पोलीस स्टेशनची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहत असते. तालुक्यातील 69 गावे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून विविध महामार्गही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातात. नव्यानेच पदभार स्वीकारलेल्या सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहेत.
मनुष्यबळाची कमतरता.. भौगोलिक दृष्ट्या विस्तारलेली हद्द... अवैध व्यवसाय... वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असते. तालुक्यातील 69 गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या ’खांद्यावर’ आली आहे. त्यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून वारुळे पोलिसांप्रती जनतेचा विश्वास प्राप्त करण्यासाठी कोणती भूमिका अंगीकारतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीन मतदारसंघातील गावे येतात. श्रीगोंदा मतदार संघातील 43, पारनेर मतदारसंघातील 25 तर नगर मतदारसंघातील बुरडगाव असे तालुक्यातील 110 गावांपैकी 69 गावे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात. तर 31 गावे एमआयडीसी पोलीस स्टेशन व दहा गावे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत येतात. त्याचबरोबर नगर जामखेड, नगर सोलापूर, नगर कल्याण, नगर पुणे, नगर दौंड या महामार्गांबरोबरच अंतर्गत रस्ते ही मोठ्या प्रमाणात आहेत. महामार्गावरील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरत आहे.
आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते यांच्या मतदारसंघातील गावे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तीन आमदारांचा ’ वॉच’ तालुका पोलीस स्टेशनवर असतो. वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, ग्रामीण भागातील बदलती सामाजिक परिस्थिती लक्षात घेता तालुका पोलीस स्टेशनची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. वाढती गुन्हेगारी.. ग्रामीण भागातील वाद विवाद.. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण.. वाहतूक कोंडी आणि अपघात नियंत्रण.. सामाजिक सलोखा आणि सण-उत्सव व्यवस्थापन याबरोबरच जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी वारूळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने व्यापक असलेल्या हद्दीतील गावांमध्ये तसेच राष्ट्रीय, राज्यमार्ग व अंतर्गत रस्त्यांवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. बदलत्या सामाजिक आणि तांत्रिक वातावरणात प्रभावी नेतृत्व, कडक अंमलबजावणी आणि लोकसहभाग याच्या बळावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाऊले उचलावी लागणार आहेत. नागरिकांनाही सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असून शांतता, सुरक्षितता अन् सुव्यवस्था राखण्यासाठी ’खमकी’ भूमिका घ्यावी लागणार आहे.
अपुरे मनुष्यबळ अन् व्यापक क्षेत्रफळ !
तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत मनुष्यबळाची संख्या कमी आहे. तसेच व्यापक क्षेत्रफळ असल्याने पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अपुरे मनुष्यबळ.. व्यापक क्षेत्रफळ.. वाढती गुन्हेगारी... अवैध व्यवसाय.. अन् महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून कोणती भूमिका अंगीकारली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
69 गावे अन् फक्त 8 पोलिस पाटील !
गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत आलेली आहे. पोलीस व नागरिकांमधील दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. परंतु पोलीस पाटलांची नियुक्ती रखडल्याचे चित्र पहावयास मिळते. तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 69 गावांपैकी केवळ 8 गावांनीच पोलीस पाटील नियुक्त आहेत. त्यामुळे इतर गावांमध्ये पोलिसांना गुप्त माहितीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी लागणार आहे.