power cut Pudhari
अहिल्यानगर

Jeur Power Cut Problem: नगर तालुक्यात विजेचा लपंडाव; जेऊर परिसरात अंधाराचे साम्राज्य

दोन महिन्यांपासून वारंवार वीज खंडित; नागरिकांचा संताप वाढला, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर महावितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे वारंवार होणारे लोडशेडिंग आणि विजेचा सुरू असलेला लपंडाव यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विजेच्या खेळामुळे पंचक्रोशीतील गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जेऊर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी तासनतास अंधार राहत असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रचंड उकाड्यात वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विद्यार्थी, शेतकरी, लहान मुले, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

जेऊर परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला असतानाही पंचक्रोशीतील गावांना सुरळीत वीज मिळत नसल्याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पाची वीज महावितरण कंपनीला जोडण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांमधून मिळत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यापासून भारनियमन व विजेचा लपंडाव वाढला असल्याची तक्रार ग्रामस्थांमधून होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाची वीज जाते कोठे? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.

दररोज सायंकाळी भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वयंपाक, जेवण, पशुपालकांना दूध काढण्याची वेळ, शेतात काम करून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विश्रांतीची वेळ, लहान बालके झोपण्याची वेळ याच कालावधीत भारनियमन होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे 24 तास पूर्ण दाबाने वीज मिळण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे.

महावितरण प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. वारंवार होणारे भारनियमन बंद करावे आणि यंत्रणेतील बिघाड कायमस्वरूपी दूर करावा अशी मागणी जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांमधून केली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

विजेचा लपंडाव आणि वाढते भारनियमन आता सहनशीलतेची परीक्षा ठरत आहे. नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर अंधाराचे सावट पसरवणारी परिस्थिती तातडीने बदलण्याची गरज आहे.
नारायण दादा तोडमल
सततचे भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला असून, परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणणे अत्यावश्यक आहे. भारनियमनाच्या सततच्या त्रासामुळे जनतेचा संयम आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.
विजय पाटोळे, माजी ग्रामपंचायत सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT