नगर : 17 वार्डात 17 जागा (प्रत्येकी एक) ओबीसी राखीव असणार असल्या तरी कोणत्यातरी एका वार्डातील दोन जागा ओबीसीसाठी राखीव निघणार आहे. हा वार्ड कोणता असेल हे मात्र मंगळवारी (दि.11) आरक्षण सोडतीवेळीच निश्चित होणार असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.(Latest Ahilyanagar News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. आता प्रभागनिहाय मतदार यादी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीचे मार्गदर्शक तत्व आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
महाापलिकेच्या 17 वार्डात 68 नगरसेवकांसाठी निवडणूक होणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. 68 पैंकी 18 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. यातील प्रत्येक वार्डात एक अशा 17 जागा राखीव असणार आहे. उर्वरित एका जागेसाठी चिठ्ठी काढली जाणार आहे. ज्या वार्डाची चिठ्ठी निघेल तेथे अगोदरच एका जागा ओबीसीसाठी असणार असल्याने त्यात पुन्हा नव्याने ओबीसीची भर पडणार आहे, म्हणजेच कोणत्यातरी एका वार्डात ओबीसीच्या दोन जागा निघणार आहे. आता त्यातील एक महिलेला जाणार की दोन्ही याबाबतच्या चर्चेने इच्छुकांची घालमेल सुरू झाल्याचे चित्र आहे.
सर्वसाधारण 40 (वीस महिला)
ओबीसी 18 (9 महिला)
अनुसूचित जाती 9 (पाच महिला)
अनुसूचित जमाती 1
अनुसूचित जाती-जमातीचे राखीव वॉर्ड
अनुसूचित जातीचे वॉर्ड 1,2,5,8,9, 13,15,16,17
अनुसूचित जमातीचा वॉर्ड क्रमांक : 7
गत निवडणुकीला अनुसुचित जमातीची जागा महिलेसाठी राखीव होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा ही जागा पुरूषासाठी असणार आहे. परिणामी महिलेची एक जागा कमी झाल्याने सर्वसाधारण महिलेच्या जागेत भर पडून ती संख्या 20 झाली आहे. गतवेळी सर्वसाधारणच्या महिला राखीव जागा या 19 होत्या.