

भातकुडगाव फाटा : ढोरसडे येथे शुक्रवारी (ता. 7) दुपारी उसाच्या फडाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाला. यात दोन शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.(Latest Ahilyanagar News)
शहरटाकळीपासून दोन किलोमीटरवर असलेल्या ढोरसडे शिवारात दुपारी शेषराव दगडू आपशेटे यांच्या शेतातील वीजरोहित्राजवळ तारेचे शॉर्टसर्किट झाल्याने उडालेल्या ठिणग्यांमुळे उसाला आग लागली. काही क्षणातच ही आग आसपासच्या शेतांमध्ये पसरली. या आगीत कविता कैलास धुपधरे यांचा साडेतीन एकर ऊस व शेषराव आपशेटे यांचा दीड एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला.
गावातील तरुणांनी धावपळ करत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे अशक्य झाले. धूपधरे यांनी साडेतीन एकर, तर आपशेटे यांनी दीड एकर क्षेत्रात ऊस लागवड केली होती. दोघांच्याही उसाला सुमारे 18 महिने पूर्ण झाले होते. धुपधरे यांच्या शेतातील उसाची तोडणी नुकतीच सुरू झाली होती. या घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.