नगर: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नगर- मनमाड महामार्गाच्या कामास प्रारंभ केला असून, प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी काम वेळेत पूर्ण करण्याचे लेखी दिले आहे. या आश्वासनानंतर खासदार नीलेश लंके यांनी दुसर्या दिवशी शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले.
नगर- मनमाड महामार्गाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला अनेकांनी पाठींबा दिला. दुसर्या दिवशीही शनिवारी उपोषण सुरुच होते. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला असल्याचे खासदार लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Latest Ahilyanagar News)
या रस्त्याच्या कामासाठी कोणाचे अपयश आहे हे खोलात न जाता रस्ता पूर्ण होणे गरजेचे आहे. वर्कऑर्डर देऊन अडीच महिने उलटले आहेत. अद्याप काम सुरु झाले नाही. पावसाचे कारण देत वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने शनिवारी कामास प्रारंभ केला. त्यानंतर प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंदरकर यांनी उपोषणस्थळी भेट देत खासदार लंके यांना काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, खासदार लंके यांच्या सहकार्यांनी या महामार्गावर प्रत्यक्ष काम सुरू झाले किंवा नाही याची खात्री केली. सहकार्यांनी दिलेल्या अहवालानंतर खासदार लंके यांनी लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे घेतले.
हे आहे लेखी आश्वासन
या आंदोलनाची दखल घेत आम्ही नगर- मनमाड या महामार्गाच्या ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार ठेकेदाराने शनिवारी राहुरी फॅक्टरी येथे ड्रेनेजचे काम, शनिशिंगणापूर फाटा येथे मिलिंगचे काम तसेच देहरे येथे अंडरबायपासचे काम सुरू केले आहे.
राहुरी तालुक्यातील कणगर, राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे प्लॅन्ट उभारणी आणि यंत्र सामग्री व लॅबोरेटरी उभारण्यात येणार आहे. महामार्गाचे काम सातत्याने सुरू राहील व विहित वेळेत पूर्ण केले जाईल, हे काम वेळेत पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच ठेकेदारास मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे.