

नगर: आषाढी यात्रेनिमित्त 5 हजार 200 जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल 9 लाख 79 हहजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये अहिल्यानगर विभागाच्या 2 कोटी 51 लाख रुपये उत्पन्नाचा समावेश असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपुरात राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक प्रवाशी येत असतात. या भाविक प्रवाशांसाठी गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या. 3 जुलै ते 10 जुलै दरम्यान या बसने 21 हजार 499 फेर्या करून तब्बल 9 लाख 71 हजार 683 भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. (Latest Ahilyanagar News)
यामधून एसटी महामंडळाला 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न मिळालेले आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी अधिक आहे. एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे महामंडळाचे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र ठरत असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.
महामंडळाच्या अहिल्यानगर एसटी विभागामार्फत 261 बसने 1 हजार 858 फेर्या पंढरपूरसाठी चलविल्या असून, 3 लाख 96 हजार किलोमीटर प्रवास झाला आहे. पंढरपूर यात्रेतून सवलतीसह सुमारे रुपये 2 कोटी 51 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये आषाढी यात्रेचे उत्पन्न रुपये 2 कोटी 39 लाख रुपये इतके होत, असे त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.