एकरूखे: नगर-मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. राहाता शहरातील रस्त्याचे कामही येत्या एका महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या सेवेसाठी खुले केले जाईल, असा विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
काल सोमवारी सकाळी डॉ. विखे पाटील यांनी राहाता शहरातील नगर-मनमाड महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. ठेकेदार व अधिकाऱ्यांसमवेत गटर्स, डिव्हायडर तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयापासून शहराच्या हद्दीपर्यंत तसेच साकुरी फाटा ते मार्केट कमिटी परिसरापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, नगरसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
महामार्गाच्या कामात व्यापारी वर्गाला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राहाता नगरपंचायत हद्दीतील नगर-मनमाड रस्त्याच्या कामाची आज पाहणी करताना डॉ. सुजय विखे यांनी नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य देत रस्त्याचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. हा रस्ता सुरक्षित, सुबक आणि आधुनिक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा केल्या जात असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रारंभीच्या टप्प्यात रस्त्याच्या साईड लेव्हल्स जास्त उंच ठेवल्यामुळे परिसरातील दुकाने व व्यावसायिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून व पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. आता रस्त्याची उंची नियंत्रित ठेवून कोणत्याही व्यावसायिकाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.बसस्थानक परिसरातील रस्ता नव्या डिझाइननुसार विकसित केला जात असून, अनावश्यक उंची टाळून समतोल पातळी राखली जात आहे. यामुळे वाहतूक सुलभ होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले जुने दुभाजक काढून टाकण्यात येणार असून, त्याऐवजी एकसंध दुभाजक उभारला जाणार आहे. सध्या असलेले लाईट पोल व झाडे यांचे योग्य नियोजन करून झाडांचे स्थलांतर केले जाईल. त्यामुळे रस्त्याची रुंदी आणि दृष्यता वाढेल. तसेच, गटर लाईनपासून दोन्ही बाजूंना साधारण दोन मीटर अंतरात फुटपाथ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भागात पेव्हिंग ब्लॉक बसवून नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पथदिव्यांनी राहाता उजळून निघणार
राहाता शहरातील स्ट्रीट लाईट व्यवस्था इलेक्ट्रिकल पद्धतीने उभारली जाणार असून, शहराबाहेरील हायवे परिसरात सोलर स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहेत. यामुळे वीजबिलाचा प्रश्न सुटून दीर्घकालीन सुविधा उपलब्ध होणार आहे.या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, रात्रीच्या वेळीही सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सोय उपलब्ध होईल.
तर माफ करणार नाही
गेल्या काही काळात या रस्त्यावर झालेल्या अपघातांची दखल घेऊन महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून कोणीही रस्त्यामध्ये बाधा आणू नये. हा रस्ता नागरिकांच्या भल्यासाठी आहे. अनेक लोकांचे जीव ह्या मधल्या कालावधी मध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या रस्त्या मध्ये जरी कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठल्याही पक्षाचा असो, त्याला माफ केलं जाणार नाही असे ही डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.