Leopard File Photo
अहिल्यानगर

Nagar Leopard News नगर शहरात बिबट्याची दहशत; महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वावर

ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद; वनविभागाकडून तीन पिंजरे लावून शोधमोहीम

पुढारी वृत्तसेवा

नगर: छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सीक्यूएव्ही, महापालिका कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे ड्रोनद्वारे निदर्शनास आले आहे. मंगळवारी पहाटे बिबट्याने सिव्हील हाडको परिसरात फेरफटका मारल्याचे दिसून आले असून, वनविभाग व पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी दिली.

सावेडी उपनगरातील दाट लोकवस्ती असलेल्या तारकपूर, प्रकाशपूर, सिव्हिल हडको परिसर, गंगा उद्यान परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड परिसर तसेच महापालिका कार्यालयाशेजारील सीक्यूएव्ही परिसरात दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आले आहे. त्यामुळे वनविभाग सतर्क झाला असून, वनविभागाचे पथकाने परिसरात दिवसरात्र गस्त सुरू केली आहे. ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

सीक्यूएव्ही परिसरात ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल दिसून आल्याने त्या ठिकाणी वनविभागाने विविध ठिकाणी तीन पिंजरे लावले असून, शोध मोहीम सुरू आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना महापालिका व पोलिस प्रशासन सहकार्य करीत आहे. बिबट्यामुळे दोन दिवसांपासून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, ड्रोनद्वारे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येते आहे.

नागरिकांनी सकाळी वॉकिंग करण्यासाठी एकट्याने फिरू नये. लहान मुलांना एकट्याला घराबाहेर सोडू नये. शहरातील गंगा उद्यान, तारकपूर, प्रकाशपूर, सिव्हील हाडको, समता कॉलनी परिसरातील नागरिकांना दंवडी देवून सतर्क राहण्याचे आवाहन आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT