नगर: जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्वगणनेस म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास 25 हजार नागरिकांनी स्वत: घरांची ऑनलाईन माहिती अपलोड केली आहे. प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरगणनेस शनिवारपासून (दि.16) प्रारंभ झाला आहे. प्रगणक गावागावांत जाऊन घरांची गणना करु लागले आहेत. 14 जूनपर्यंत 2026 पर्यंत घरगणना मोहीम सुरू राहणार आहे.
देशात 1872 पासून जनगणनेची परंपरा सुरु असून, स्वातंत्र्यानंतरची ही 8 वी जनगणना आहे. जनगणना-2027 ही दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.
ही जनगणना-2027 आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांसाठी 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध केली होती. परंतु याला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
जनगणनेसाठी 6 हजार 869 प्रगणक व 1 हजार 145 पर्यवेक्षक असे 8 हजार 14 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षित प्रगणक शनिवारपासून (दि.16) आपापल्या गटातील घरांची गणना करु लागले आहेत. घरमालकांना 33 प्रश्न विचारुन ती माहिती ऑनलाईन अपलोड केली जात आहे. 14 जूनपर्यंत मोहीम सुरू राहणार असून, महिनाभराच्या कालावधीत प्रत्येक प्रगणकाला जवळपास 180 घरांची माहिती ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे.
जनगणना राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी आलेल्या प्रगणकाला आपापल्या घराबाबतच्या 33 प्रकारच्या प्रश्नांची माहिती द्यावी. यामध्ये घरांची संख्या, घरांचा प्रकार, कुटुंबाची माहिती तसेच सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश आहे. घराबाबतची अचूक व विश्वासार्ह माहिती देऊन प्रगणकाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.