

नगर/संगमनेर: संगमनेरमधील बिअरबारमध्ये चोरी केलेली दारू नाशिकच्या बारमध्ये विकल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणला. दारू चोरी करण्यासाठी नाशिकच्याच बिअरबार चालकाने वाहन उपलब्ध करून दिल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना अटक केली असून त्यांनी पाच गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर, पंचवटी, नाशिक, आकाश सचिन सुर्यवंशी (रा. दत्त चौक, सिडको, नाशिक आणि मेहताब गुलाम रसुल अन्सारी (मुळ रा.गिरटी, झारखंड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचा चौथा साथीदार बंटी दास (रा.झारखंड) हा मात्र पसार झाला आहे. चोरीची दारू विकत घेणाऱ्या किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांनाही पोलिसांनी आरोपी केले असून यातील किरण उगले यास अटक करण्यात आली. किरण उगले याच्याकडून विविध कंपन्यांची चार लाखांची दारू, कार व इतर साहित्य असा साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संगमनेरमधील हॉटेल निलायम बारचे शटर उचकटून विविध कंपन्याची 3 लाख 6 हजार रुपयांची विदेशी दारू तसेच सिगारेट व सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर 3 मे रोजी चोरी झाला होता. किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी ता. संगमनेर) यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलिस सोनल भागवत, चालक महादेव भांड यांच्या पथकाने चोरट्यांचा माग शोधून काढला.
अनेक ठिकाणी भेटी दिल्यानंतर व्यवसायीक कौशल्याचे आधारे ही चोरी झाल्याचा माग मिळाला. हसन हमजा कुट्टी (रा.नाशिक) याने ही चोरी केल्याची माहिती मिळताच पोलिस त्याच्या शोधासाठी नाशिकला रवाना झाले. नाशिकच्या वडाळा भागातील म्हाडा बिल्डींग येथून हसन हमजा कुट्टी, आकाश सचिन सुर्यवंशी, मेहताब गुलाम रसुल अन्सारी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली देत बंटी दासचा सहभाग असल्याची कबुली दिली. अटकेतील किरण उगलेकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांची चार लाख रुपयांची विदेशी दारू, दीड लाखाची कार, एअर पिस्तूल असा 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आरोपींनी अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये दोन, पिंपळगाव बसवंत, वावी येथील पाच गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीची दारू घेणाऱ्यानेच दिली कार
संगमनेरच्या बारमध्ये चोरी केलेली दारू नाशिकच्या पळसे येथील हॉटेल लकी बार ॲ़ण्ड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले, विवेक अरुण उगले यांना विकल्याची कबुली अटकेतील तिघांनी दिली. चोरी करण्यासाठी विवेक उगले याने वाहन उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिस दोघांच्या अटकेसाठी नाशिकला पोहचले, मात्र विवेक उगले पसार झाला तर किरण उगले पोलिसांच्या हाती लागला.