नगर: डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर घातलेल्या सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने बंदी घालण्याऐवजी नियम व अटींचे बंधन घालावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
गणेशोत्सवानिमित्त डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. या बंदीविरोधात या व्यावसायिकांनी शुक्रवारपासून (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. डीजे व्यवसायावर चालक, ऑपरेटर, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बँकांचे कर्ज, वाढते व्याजदर आणि व्यवसायावरील निर्बंध यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात राहुरी तालुका साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साळवे, श्रीगोंदाचे मंगेश घोडके, पाथर्डीचे नय्युम शेख, शेवगावचे सचिन कराळे, नेवाशाचे प्रशांत मोटे, श्रीरामपूरचे युवराज भागवत, राहात्याचे नीतीकेश थेटे यांच्यासह साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
डीजेवरील अनावश्यक निर्बंध तत्काळ हटवावेत, नियमांमध्ये राहून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी, परवानगी प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करावी, लग्नसोहळा व इतर शुभकार्यांसाठी पोलिस परवानगीची अट शिथिल करावी, डीजे व्यावसायिक व ऑपरेटरवर होणारे हल्ले व अमानुष वागणूक रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
डीजे व्यावसायिक म्हणतात...
ध्वनिमर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करू
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा
सर्वच व्यावसायिकांना दोषी ठरवून सरसकट बंदी अन्यायकारक