

नगर: जिल्ह्याच्या राजकारणाची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राज्यातील वरिष्ठ नेते नेहमीच आग्रही असल्याचे दिसले आहे.
गत पाच वर्षांतील राज्याच्या घडामोडींचा परिणाम थेट बँकेच्या सत्तासमीकरणावरही झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही राज्यातील सत्तेचा नगरच्या नेतृत्वाला फायदा होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. सर्वच पक्षांच्या नेतृत्वाकडून थेट मुंबईतून नगरची व्यूहरचना सुरू आहे. शिष्टमंडळाना कुठे स्वबळाचे, तर कुठे जुळवून घेण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
दरम्यान, राज्यात 2019 च्या निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी होऊन, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले होते.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचे 9 आमदार होते. यामध्ये काँग्रेसचे संग़मनेरात बाळासाहेब थोरात, श्रीरामपुरात लहू कानडे, राष्ट्रवादीचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार, पारनेरमध्ये नीलेश लंके आणि शिवसेनेचे नेवाशात शंकरराव गडाख यांचा समावेश होता.
शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आणि शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे असे भाजपचे तीन आमदार होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते. नगरमध्ये बाळासाहेब थोरात व शंकरराव गडाख कॅबिनेट मंत्री होते. त्याचदरम्यान, 2021 मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती.
सहमतीतून 17 जागा बिनविरोध; पण...
त्या वेळी बँकेच्या निवडणुकीत राज्यातील सत्तेचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. विरोधी भाजपच्या गटाने कोणताही विरोध न करता मविआच्या नेत्यांनी दिलेला बिनविरोध निवडणुकीचा फॉर्म्युला मान्य केला.
या सहमतीतून पहिल्याच फेरीत 17 जागा बिनविरोध झाल्या, तर चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली होती. त्यातही निकालानंतर दोन जागा मविआला आणि दोन भाजपला मिळाल्या. थोरात व गडाख मंत्री असल्याने बिनविरोध प्रक्रियेत त्यांचे ‘शब्द’ प्रमाण ठरले. त्यामुळेच नकळत संचालक मंडळातही 15 संचालकांच्या रूपाने मविआचे प्राबल्य दिसले.
थोरात-गडाखांचे बेरजेचे राजकारण
संगमनेरात थोरातांनी माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे अशा दोघांना बिनविरोध बँकेत पाठवले. अकोल्यातून सीताराम गायकर आणि अमित भांगरे, कोपरगावातून आशुतोष काळे, राहुरीतून अरुण तनपुरे, नेवाशातून शंकरराव गडाख, शेवगावमधून चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्यातून राहुल जगताप आणि अनुराधा नागवडे, पारनेरमधून उदय शेळके, प्रशांत गायकवाड, श्रीरामपुरातून करण ससाणे, भानुदास मुरकुटे असे 14 संचालक मविआच्या विचारांचे होते.
भाजपचे शिवाजीराव कर्डिले हेही सुरुवातीला थोरात गटासोबतच होते. अण्णासाहेब म्हस्के, मोनिका राजळे, विवेक कोल्हे, अमोल राळेभात, आशा तापकीर असे पाच संचालक शेवटपर्यंत भाजपसोबत दिसले. बँकेत विरोधकांशी तडजोड करताना बहुमत आपल्याकडेच कसे असेल, याची मविआच्या नेत्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती.
सत्ताबदल आणि त्यानंतर...
बाळासाहेब थोरात यांनी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ॲड. उदय शेळके यांना आणि उपाध्यक्षपदी काँग़्रेसचे माधवराव कानवडे यांना संधी दिली. दरम्यान, 2022 मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले होते.
जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद आले. राज्याच्या राजकीय पटलावरील वादळी वारे जिल्ह्यात हालचाली घडवू पाहत असतानाच, फेब्रुवारी 2023 मध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे निधन झाले आणि लगेच मार्चमध्ये अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक लागली.
तोपर्यंत बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्ष निवडीच्या एक दिवस अगोदर नगरमध्ये संचालक मंडळाची बैठकही घेतली; पण भावी अध्यक्षाचे नाव मात्र त्यांनी सस्पेन्स ठेवले.
त्याच वेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी थेट नगरमध्ये लक्ष घातले! त्यांनी मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्याचेही समजले. इकडे 14 संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडीकडून चंद्रशेखर घुले यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्याच वेळी केवळ 7 संचालकांच्या पाठबळावर भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचाही अर्ज आला. या निवडणुकीत मविआची पाच मते फुटली. त्यातले एक बाद झाले. कर्डिले केवळ एका मताने विजयी झाले आणि बँकेत पहिल्यांदा कमळ फुलले.
पुढे युतीमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली. सन 2024 मध्ये राज्यात निवडणुका झाल्या. महायुती सत्तेत आली. दरम्यान, 2025 मध्ये स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले आणि नोव्हेंबर 2025 मध्ये बँकेची पोटनिवडणूक झाली.
त्यात आता अजित पवारांची राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत होती. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदी 2023मध्ये पराभूत झालेले राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले 2025 मध्ये मात्र बिनविरोध विराजमान झाले. राज्यातील सत्तेचा वरचष्मा जिल्हा बँकेच्या राजकारणावर कायम राहिला तो असा...
शिंदे फॅक्टर अन् थोरातांचा ‘योग्य निर्णय’
राज्यात आज महायुतीचे सरकार आहे. या वेळीही जिल्हा बँक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे समजते. बँकेची निवडणूक बिनविरोध करायची ठरल्यास, थोरात-गडाख यांना विचारात घ्यावेच लागणार आहे.
त्यासाठी महायुतीकडून त्यांना पारनेर सोडून चार जागांचा फॉर्म्युला दिला जाणार असल्याचेही खासगीत एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा भेटीगाठींचा जोर ओसरला असला तरी ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहेच. मात्र, थोरातांनी ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ’, असे सूतोवाच केले आहे. त्यामुळे तो ‘योग्य निर्णय’ काय आणि त्याची ‘योग्य वेळ’ कोणती, याची अवघ्या जिल्ह्याला उत्कंठा आहे