नगर तालुका: नगर– दौंड महामार्गावर खंडाळा शिवारात दोन मालट्रकची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. दोन्ही ट्रक एकमेकांवर एवढ्या जोरात आदळल्या की, काही क्षणात दोन्ही ट्रकने पेट घेतला. ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत दोन्ही मालट्रक व त्यामधील माल जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे. अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खंडाळा परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या घरासमोर शनिवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मालट्रक (एमएच १६ एई ०८६०) नगर एमआयडीसी मधील कंपनी मधून लोखंडी जॉब घेवून दौंड कडे चालला होता. दुसरा मालट्रक (एमएच १८ बीझेड ७३५२) कापडाचे गठ्ठे घेवून दौंड कडून नगर मार्गे धुळ्याकडे चालला होता.
पहाटेच्या सुमारास दोन्ही मालट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघाचा मोठा आवाज आल्यानंतर कार्ले कुटुंबीय व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. नगरच्या मालट्रकचा चालक सोमनाथ नागरगोजे (रा. वडगाव, ता.पाथर्डी) हा केबिनच्या काचा फोडून बाहेर पडला. तर धुळ्याकडे चाललेल्या ट्रक चालक संजय दावर (रा.शिरपूर,सेंदवा, मध्यप्रदेश) यास संदेश कार्ले व इतरांनी केबिन मधून बाहेर काढत तो गंभीर जखमी असल्याने स्वतःच्या गाडीतून उपचारासाठी नगरला पाठविले.
अपघातानंतर काही वेळात एका ट्रकच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होवून दोन्ही वाहनांना मोठी आग लागली. कार्ले यांनी तत्काळ अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला व पोलिसांना कळवले. मालट्रक मध्ये कापड झाल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. तातडीने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. कार्ले यांनी त्यांच्या शेतातील वीज पंप सुरु करून पेटलेल्या गाड्यांवर पाण्याचा मारा केला. दीड तासांच्या अथक परिश्रमांनंतर आग विझली. मात्र तो पर्यंत दोन्ही वाहने आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले होते. नगर तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.