

श्रीरामपूर: जेवणाची ऑर्डर उशीरा आल्याच्या कारणातून हॉटेल मालकाचा खून करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. हल्ल्यात हॉटेल मालकाच्या कुटुंबातील दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश चंद्रशेखर वेंकटरमन दुबैय्या (वय ३४) असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. चंद्रशेखर दुबैय्या आणि कैलास दुबैय्या अशी जखमी दोघांची नावे आहेत. ओम डफळ, यश जाधव, सूरज जाधव या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवर दुबैय्या यांचे लक्ष्मीनारायण अॅन्ड लॉजिंग नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमधील लॉजिंगवर मुंबईतील तिघे दोन दिवसांपासून थांबले होते. शनिवारी दुपारी त्यांनी लॉजमधील खोलीत जेवण ऑडर्र केले. ते उशिराने आले. नशेतील तिघांनी वेटरला उशिरा आलेला ऑर्डरचा जाब विचारत मारहाण केली. हॉटेल मालक आकाश दुबैय्या हे मध्यस्थीसाठी धावले असता नशेतील तिघांपैकी एकाने डोक्यात खुर्ची मारली, तर इतरांनी तोंडावर मारहाण केली. खुर्चीचा घाव वर्मी लागल्याने डोक्यातून रक्तस्त्राव होत त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
कुणाला दुबैय्या हेही मारहाणीत जखमी झाले आहेत. पुण्याहून नुकतेच श्रीरामपुरात पोहचलेले चंद्रशेखर दुबैय्या यांनी हॉटेलमध्ये धाव घेत हस्तक्षेप करत मिटवामिटवीचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. जखमींनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील आकाशचा मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. हल्ल्याचे वेळी हॉटेलमध्ये नेमकी किती जण उपस्थित होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
टॉयलेटमध्ये लपला पण पोलिसांना घावला!
परिसरातील काही लोकांनी सुरज सुरेश जाधव (वय २५) याला पकडून बेदम मारहाण केली. मारहाणीत तो जखमी झाला आहे. जखमी सुरज जाधवसह दवाखान्यामधील टॉयलेट मध्ये लपून बसलेल्या यश जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी सुराज जाधव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरजवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात ओम डफळ हा टेरेसवर लपून बसला होता. सायंकाळी सहा वाजता डफळ यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. डफळ हा येथील नर्सिंग स्कूलचा विद्यार्थी असून तोही रूममध्ये पोलिसांना आढळून आला.
नगरच्या बैठकीतून वरिष्ठ श्रीरामपुरात
श्रीरामुपरात खून खराबा सुरू होता, त्याचवेळी अहिल्यानगरला पोलिस दलाची बैठक सुरू होती. या बैठकीसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक विशाल खैरे नगरला बैठकीत होते. खूनाची माहिती मिळताच ते बैठक सोडून श्रीरामपूरात पोहचले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकही लागोलाग श्रीरामपुरात पोहचले. फॉरेन्सिक पथकाकडून हॉटेलची तपासणी सुरू करण्यात आली.
आजपासून श्रीरामपूर बंदचा निर्णय
दुबैय्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर बंदचा निर्णय सर्व व्यापारी व सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. शहरातील गुन्हेगारीचा बीमोड होत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर बंदची हाक दिली असून सोमवारी (दि. १३) पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.