नगर: कोपरगावच्या समता आणि सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतील खरातचे आर्थिक कारनामे समोर आल्यानंतर असाच प्रकार संत नागेबाबा, बुलढाणा अर्बन, राहाता पिपल्स आणि राहातामधील स्वामी विवेकानंद या चार पतसंस्थेत झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
भोंदू खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची माहिती या संस्थेकडे पोलिसांनी मागविली आहे. दरम्यान भोंदू खरातचा आर्थिक व्यवहार पाहणारे रमेश हिंगे यांची शिर्डी पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत रमेश हिंगे व त्यांच्या भावाचे नावाने प्रत्येकी 49 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
भक्तांचे पॅन आणि आधारकार्डद्वारे भोंदू खरातने कोपरगावच्या समता आणि सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेत 132 खाती उघडली. या सर्व खात्यांना नॉमिनी म्हणून खरातचे नाव असून त्याचेच मोबाईल नंबर लिंक आहेत. या खात्यातून 62 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी खातेदारांकडे चौकशी केली असता खातेदारांनी खाते आपले नसल्याचे सांगत सही बनावट असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. भोंदू खरातचे कोणाकोणाशी संबंध होते, याची माहिती पोलिसांनी संकलीत केली. त्यानंतर पोलिसांनी संत नागेबाबा, राहाता पिपल्स, बुलढाणा अर्बन आणि राहाता येथील स्वामी विवेकानंद पतंसस्थेला पत्र पाठवत खरातशी संबंधित खात्याची माहिती मागविली आहे. या संस्थेत खरातने आर्थिक उलाढाल केल्याचा संशय पोलिसांना आहे.
भोंदू खरात स्वतःच हाताळायचा खाती!
शिर्डी पोलिसांनी शनिवारी सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची चौकशी केली. त्यात जगदंबामधील 32 खात्याचे आर्थिक व्यवहार खरातनेच पाहिले असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. दरम्यान ज्या ज्या पतसंस्थेत खरातशी संबंधित खाते आहेत, त्या खातेदार व पतसंस्था व्यवस्थापनाला पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केल्याचे समजते.