शेवगाव: पाच महिन्यानंतर नागलवाडी दरोड्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले, पण चोरीचे सोने हस्तगत करण्याच्या ‘आकड्या’वरून मात्र हा तपासाच संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. ५७ तोळे सोने चोरीस गेले, मात्र पोलिसांनी केवळ २१ तोळेच हस्तगत केले, शिवाय दोन सराफांच्या सहभागाची शक्यता असतानाही केवळ एकालाच ताब्यात घेत दुसऱ्याला अभय दिल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा खरी की खोटी, याची शहनिशा वरिष्ठ पातळीवरून व्हावी, अशी मागणी जोर धरू पाहत आहे.
शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकत चोरट्यांनी रोकड व ५७ तोळे सोने लंपास केले होते. दरोड्याची उकल होत नसल्याची नागरिकांची पोलिसांविषयी नाराजी होती. पाच महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची छडा लावत त्यांना बेड्या ठोकल्या. पकडलेल्या आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पण शेवगाव पोलिसांच्या ‘कर्तबगारी’च्या सुरस कथा आता समोर येवू पाहत आहे.
चोरीचे सोने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सराफाला विकल्याची माहिती पोलिसांनी तपासात मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या सराफाकडे चौकशीचा मोर्चा वळविला. या सराफाकडून २१ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. मात्र उर्वरित सोने हस्तगत करण्याचे सोडून ‘काय-द्यायची’ भाषा बोलली गेल्याच्या चर्चेल पेव फुटले आहे. ‘काय-द्याच्या’ भाषेमुळे खिसे गरम झाले अन् पुढचा तपासही थंड झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सोने हस्तगत करतानाचा पंचनामा, मुद्देमाल कक्षात जमा केलेला मुद्देमाल याची स्पष्टता नसल्याना तपासाभोवती संशय बळावत चालला आहे.
एसपींनी चौकशी करावीच!
तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. चोरी ५७ तोळे गेले अन् हस्तगत २१ तोळे मग बाकीचे गेले कोठे? असा संशयास्पद सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिस अधीक्षकांनी या तपासाची स्वतंत्र पथकामार्फत चौकशी करावी, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
एका सराफाकडून सोने हस्तगत, दुसरा कुठंय?
चोरीचे सोने घेणारा एकच सराफ असेल तर त्याच्याकडून २१ तोळेच कसे हस्तगत केले? बाकीचे कोठे? अन् चोरीचे सोने घेणारे दोन सराफ असतील तर दुसरा कोठे? त्याच्याकडून चोरीचे सोने हस्तगत कधी होणार? त्याचा ठावठिकाणा लागूनही सोने हस्तगत का केले जात नाही? याबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेष म्हणजे हा दरोडा उघडकीस आणला तो स्थानिक गुन्हे शाखेने अन् पुढचा तपास केला तो शेवगाव पोलिसांनी. तपासाचा हा संशय एलसीबीला ठाऊक आहे की नाही? याबाबतही तर्कविर्तक लढविले जात आहेत.
नागलवाडी दरोडा प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींसह एका सोनाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २१ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. आणखी तपास सुरू आहे.बाजीराव सानप, पोलिस उपनिरीक्षक