Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Muthewadgaon Society Politics: मुठेवाडगाव सोसायटीत महायुतीत फूट; मुरकुटे-विखे समर्थकांची चार वर्षांची युती संपुष्टात

जिल्हा बँकेच्या ठरावावरून मतभेद; मुरकुटे-ससाणे समर्थक एकत्र, अनिल मुठे यांच्या नावाचा ठराव आठ मतांनी मंजूर

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: तालुक्यातील मुठेवाडगाव सोसायटीत गेल्या चार वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या महायुतीमधील नेत्यांच्या समर्थकांतील युती अखेर संपुष्टात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून मतभेद निर्माण झाल्यानंतर सोसायटीत नवीन राजकीय समीकरण आकारास आले असून, मुरकुटे-ससाणे समर्थकांनी एकत्र येत ठरावाला मंजुरी मिळविली. जिल्हा बँकेच्या ठरावावरून महायुतीत ठिणगी पडल्याचे दिसून आले.

सोसायटीतील अध्यक्ष निवडीसह विविध महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गेल्या चार वर्षांपासून मुरकुटे गटाचे शिवाजी मुठे आणि विखे गटाचे शंकर मुठे यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. दुसरीकडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, सरपंच सागर मुठे आणि त्यांच्या सहा संचालकांचा गट या युतीच्या विरोधात होता. जिल्हा बँकेच्या ठरावाला राजकीयदृष्ट्या महत्त्व असल्याने संबंधित ठराव आपल्या गटाच्या बाजूने व्हावा, अशी विखे समर्थकांची भूमिका होती.

मात्र, त्यास मुरकुटे गटाने सहमती न दर्शवल्याने दोन्ही गटांतील युती तुटली. त्यानंतर मुरकुटे गटाने श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या समर्थकांशी चर्चा केली. त्यापूर्वी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव मुठे यांनी सरपंच सागर मुठे, ज्येष्ठ संचालक सुभाष मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, संचालक अण्णासाहेब मुठे, माजी सरपंच जालिंदर मुठे, गोकुळ मुठे, नितीन बोरुडे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका निश्चित केली.

ठराव सभेत अनिल रमेश मुठे यांच्या नावाचा प्रस्ताव शिवाजी मुठे यांनी मांडला, त्यास बबनराव मुठे यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावाला आठ संचालकांनी पाठिंबा दिला. समर्थकांमध्ये सुभाष मुठे, भास्कर मुठे, रमेश मुठे, अण्णासाहेब मुठे, रंगनाथ कोळसे आणि तुकाराम रुपटक्के यांचा समावेश होता. तर शंकर मुठे, द्वारकाताई मुठे, संभाजी गोसावी आणि भागवत मुठे यांनी विरोधात मतदान केले.

दरम्यान, माजी चेअरमन शकुंतला मुठे यांनी त्यांच्या परिवारातील सदस्याचे नाव ठरावासाठी सुचविले होते. मात्र, त्यांना कोणत्याही प्रमुख गटाचा पाठिंबा मिळाला नाही. अखेरीस अनिल मुठे यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला. यावेळी लहानू मुठे, गणेश गोसावी, ज्ञानदेव मुठे, अमोल मुठे, बाळासाहेब भोंडगे, किरण मुठे, अनिल मुठे, शिवाजी रुपटक्के, सोसायटीचे सचिव दत्तात्रय जासूद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT