Municipal Elections Independent Candidates Pudhari News Network
अहिल्यानगर

Municipal Elections Independent Candidates: नगरपालिकांमध्ये अपक्षांचा प्रचार चिन्हांविनाच सुरू

उमेदवारांना चिन्हांचे वाटप बुधवारी, निवडणूक 2 डिसेंबरला

पुढारी वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात अकरा नगरपालिका व एका नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची माघार झाल्यानंतर नगराध्यक्षपदांसाठी 102 आणि नगरसेवकपदांसाठी 1274 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार असल्यामुळे अपक्ष उमेदवारांना चिन्हांविनाच प्रचार करावा लागत आहे. दरम्यान, या निवडणुकांसाठी 194 मुक्तचिन्ह आहेत.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायत आदींच्या 2 डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत होती. ज्या ठिकाणी अपील आहे. त्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुभा आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.

दरम्यान, बहुतांश ठिकाणी 21 नोव्हेंबर रोजीच निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत अपक्षांची संख्या अधिक आहे. चिन्हांचे वाटप होण्यासअवधी असल्याने अपक्ष उमेदवारांनी शनिवारपासूनच चिन्हांविनाच प्रचार सुरू केला आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदानवेळ संपण्यापूर्वी 48 तासांपूर्वीच म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळीच जाहीर प्रचार संपणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी अवघे पाच दिवस उमेदवारांना मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होताच प्रचारास प्रारंभ केला आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा देखील सोमवारी होत आहेत.

नगरपालिका निवडणुकांसाठी भाजप, काँग्रेस, भाकप(एम), बहुजन समाज पार्टी व आम आदमी पार्टी आदींसह राष्ट्रीय पक्षांची पाच, राज्यस्तर पक्षांची पाच, इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांची नऊ चिन्हे राखीव आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारांसाठी 194 मुक्तचिन्ह आहेत.

पांगुळगाडा, फुगा अन्‌‍ उशी

अपक्ष उमेदवारांसाठी 194 मुक्तचिन्ह आहेत. यामध्ये पांगुळगाडा, फुगा, बाकडे, कलिंगड, घागर, खलबत्ता, वाटाणे, पेरू, पाव, ब्रश, कॅन, मेणबत्ती, जाते, कंगवा, बिस्कीट, केक आईस्क्रीम, आले, हिरवी मिरची, सफरचंद, ढोबळी मिरची, फुलकोबी, द्राक्षे, फणस, भेंडी, मका, भुईमूग, अननस, सूर्यफूल, अक्रोड, ऊस, टॉर्च, बेंच, पुस्तक, पेटी, बादली, कॅमेरा, काटा चमचा, हॅट, नेल कटर, उशी, घागर, करवत, कात्री, चिमटा, सूप अशा मजेशीर मुक्तचिन्हांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT