Police  Pudhari
अहिल्यानगर

Municipal Election Preventive Action: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहर पोलिसांची धडक कारवाई; 1,231 जणांवर प्रतिबंधात्मक उपाय

प्रचार सुरू होण्याआधीच अहिल्यानगर ‘कंट्रोल’मध्ये; गुन्हेगार, संशयित व अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा

पुढारी वृत्तसेवा

नगर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांनी तब्बल 1 हजार 231 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीपूर्वीच पोलिसांनी शहर ‌‘कंट्रोल‌’मध्ये आणत रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित, अवैध धंदे करणारे व संभाव्य गैरवर्तन करणाऱ्यांना कारवाईचा बडगा उगारला.

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या (दि. 2) संपत असून उद्या (शनिवार) पासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होणार आहे. या काळात नेत्यांच्या सभा, चौक सभा, घरोघरी प्रचार मोठ्या प्रमाणात होणार असल्याने निवडणूक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत ही व्यापक कारवाई करण्यात आली.

निवडणुकीत अडथळा आणण्याची शक्यता असलेल्या 668 संशयितांकडून भारतीय न्याय संहिता कलम 126 नुसार चांगल्या वर्तणुकीचे बॉंड घेण्यात आले. त्याचबरोबर अवैध दारू विक्री करणार्या 16 संशयितांना मुंबई प्रोव्हेटीव्ह ॲक्ट 93 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार सहा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, शिक्षा भोगून आलेल्या एका गुन्हेगारालाही कलम 57 नुसार शहराबाहेर काढण्यात आले आहे.

एकूणच, निवडणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, मतदार भयमुक्त वातावरणात मतदान करू शकावेत आणि प्रचार शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. प्रचाराच्या आधीच झालेली ही धडक कारवाई म्हणजे निवडणूक काळात गैरवर्तन करणार्यांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे.

63 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बाँड वॉच

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहवी आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस यंत्रण सजग आहे. पोलिसांनी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 63 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कलम 129 नुसार बॉंड लिहून घेतला आहे. त्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.

488 हॉटेल चालकांना नोटिसा

महापालिका निवडणूक काळात रात्री उशिरापर्यंत हॉटेल, दुकाने सुरू राहिल्याने गर्दी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सजग झाली आहे. पोलिसांनी शहरातील 477 चालक व मालकांना भारतीय न्याय संहिता कलम 168 (2) नुसार नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT