नगर: पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधी मुंबई येथे पोलिस महासंचालकाच्या कार्यालयात सहायक पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती झाली आहे. तसे आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केले आहेत.
गृह विभागाने पोलिस दलातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात घार्गे यांची बदली झाली. सुदर्शन मूळचे आंध्र प्रदेशातील असून 2016 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
क्राईम रेटमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव पहिल्याचा दहामध्ये आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना त्यांच्या कडक शिस्तीने कायदा व सुव्यस्था हाताळावी लागणार आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी, गोमांस तस्करीच्या मोठ्या कारवाई करण्यात आल्या. सिस्पे व अन्य शेअर मार्केटिंग कंपन्या व ग्रो-मोअर फसवणुकीच्या गुन्ह्यात बारकाईने तपास करण्यात यश मिळाले. परंतु, मुद्देमाल कक्षातून पोलिस कर्मचाऱ्याने ड्रग्ज चोरल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अनेकवेळा पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
कडक शिस्तीचा अन् नव्या दमाचा एसपी
कठीण प्रसंगाना तोंड देत काही माणस स्वतःचा रस्ता स्वतःतयार करतात. जोपर्यंत यशाचा पल्ला गाठत नाही तोपर्यंत ती थांबत नाहीत. असे कडक शिस्तीचे आणि गुन्हेगारीवर वचक ठेवणार व्यक्तिमत्व म्हणजे आयपीएस मुम्मका सुदर्शन होय. त्यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
आयपीएस मुम्मका सुदर्शन यांचे मूळ गाव कडपा (आंध्रप्रदेश) आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील दूरसंचार विभागात कर्मचारी होते. घरात शिस्त, प्रमाणिकपणा आणि कर्तव्यभाव ही मूल्य त्यांच्यात लहानपासून रुजली.
प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेलली. पण, त्यांच्या मनातील जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण समाजासाठी काहीतरी वेगळे केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यानंतर ते युपीएससीकडे वळले. कष्ट, जिद्द, मेहनतीच्या जोरावर त्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. भारतीय पोलिस सेवेच्या प्रतिष्ठित पदावर त्यांनी नाव कोरले. ते 2016 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांच्या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी म्हणून पुसद येथे नियुक्ती झाली. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त असलेल्या आरमोरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त भागात त्यांनी केवळ बंदूक नव्हे तर, संवादही महत्त्वाचा आहे, असे सांगून नक्षलग्रस्त भागात पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला.
त्यानंतर परभणी येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून दोन वर्ष यशस्वी कार्यकाळ सांभाळल्यानंतर त्यांची नागपूर येथे क्राईम ब्रँचला डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. नागापूर येथे दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारांना वठणीवर आणले. नागपूर सारख्या गुन्हेगारीच्या शहरात कोणाच्याही दबावाला बळी न पडता सामान्य माणसांमध्ये पोलिसिंग रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सोंटू जैनसारख्या आंतरराज्यीय टोळीवर कारवाई केली. अनेक गुन्हेगारांच्या साखळ्या उद्ध्वस्त केल्या. त्यांना सुपर ॲक्टिव्ह डीसीपी म्हणून ओळख मिळाली.
नागपूरच्या यशस्वी कार्यकाळानंतर पहिल्यांदा त्यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. चंद्रपुरात वाळू तस्करी, मद्य तस्करी, अवैध धंद्यांवर त्यांनी वचक बसविला. आता राज्यात क्राईमरेटमध्ये पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये नाव असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांची एसपी म्हणून नियुक्ती झाली आहे. वाळू तस्करी, अंमली पदार्थ तस्करी, ड्रग्ज तस्करी, गावठी कट्टे, शेअर मार्केटमधील फसवणुकीच्या गुन्हे यावर त्यांना वचक ठेवावा लागणार आहे.