Mula Dam Pudhari
अहिल्यानगर

Mula Dam Water Release: मुळातून आजपासून खरिपासाठी आवर्तन; आवक मंदावली, धरण अजूनही न भरल्याने चिंता

ऐन पावसाळ्यात खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात येऊ नयेत यासाठी मुळा धरणातून आवर्तन सोडण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

राहुरी: मुळा धरण ९५ टक्के भरले असले तरी पाणलोट क्षेत्रासह मुळा लाभक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. ऐन पावसाळ्यात खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात येऊ नयेत यासाठी मुळा धरणातून आवर्तन सोडण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून आवर्तनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दरम्यान, धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना या आवर्तनात पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरले जाणार असल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मुळा धरणातून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडले जाणार आहे. नियोजनानुसार डाव्या कालव्यात सकाळी ६ वाजता ५० क्युसेकने, तर उजव्या कालव्यात सायंकाळी ६ वाजता ३०० ते ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार आहे. वांबोरी चारीला सकाळी ९ वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ऐन पावसाळ्यात आवर्तनाची वेळ

सामान्यतः पावसाळ्यात धरणातील पाणीसाठा वाढत जाऊन खरीप पिकांना पाण्याची कमतरता भासू नये, अशी अपेक्षा असते. मात्र यंदा परिस्थिती काहीशी उलट झाली आहे. धरण ९५ टक्के भरले; मात्र पावसाअभावी खरीप पिके वाचविण्यासाठी आवर्तन सोडण्याची वेळ आली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उभी केलेली खरीप पिके संकटात सापडू नयेत, यासाठी हे आवर्तन महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र आवर्तनामुळे धरणातील साठा कमी होणार असल्याने आगामी काळात पाऊस आणि धरणात होणारी आवक याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आवर्तनासाठी खर्च होणार पाच टीएमसी

मुळा धरणात २४.६ टीएमसी पाणीसाठा उपलब्‍ध असून, लाभक्षेत्रातील ४० हजार हेक्‍टर खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्‍याचा निर्णय झाला आहे. ४५ दिवस हे आवर्तन राहणार असून, याव्‍दारे जवळपास ५ टीएमसी पाण्‍याचा सिंचनासाठी वापर होणार आहे. पावसाची प्रतीक्षेत असलेल्‍या राहुरी, नेवासा, पाथर्डी आदी तालुक्‍यांतील शेतकर्‍यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT