

श्रीगोंदा: झाडाची फांदी तोडण्याच्या किरकोळ कारणावरून श्रीगोंदा नगरपरिषदेत गुरुवारी (दि. २०) दुपारी चांगलाच गोंधळ उडाला. भाजप नगरसेविका अश्विनी काळे यांचे पती प्रवीण काळे यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण करत नगरपरिषदेच्या अभियंत्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली.
नगरपरिषद प्रशासनाच्या सूचनेनुसार काळकाई चौकात एका नागरिकाच्या तक्रारीवरून पहिल्या मजल्याच्या गॅलरीत शिरणारी झाडाची फांदी तोडण्याचे काम सुरू होते. यासाठी ठेकेदार सचिन वाघ यांची क्रेन लावण्यात आली होती.
त्या ठिकाणी येऊन प्रवीण काळे यांनी ‘माझ्या परस्पर क्रेन कशी लावली?’ असे म्हणत ठेकेदाराचा कर्मचारी सचिन इंगळे यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर प्रवीण काळे थेट नगरपरिषद कार्यालयात गेले आणि विद्युत अभियंता आकाश सानप व पाणीसाठा अभियंता सागर पडोळकर यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
नगरसेविकेचा पती अशा पद्धतीने पालिकेत जाऊन दादागिरी करत असेल तर पक्षश्रेष्ठींनी त्यांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राजकीय दबावापोटी कामात अडथळे आणले जात असल्याचा आरोप प्रशासनाकडून होत आहे.
घडलेल्या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी मला दिली. पालिकेच्या कामात अशा प्रकारे हस्तक्षेप करणे आणि कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासकीय प्रमुख म्हणून कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. या गैरवर्तनाचा मी तीव्र निषेध करते. प्रथम वेळ म्हणून आणि लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा विचार करून सध्या सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पुढे असा प्रकार घडल्यास संबंधित नगरसेविका यांच्या अपात्रतेबाबत व कायदेशीर कारवाईबाबत पावले उचलली जातील.
- पुष्पगंधा भगत, मुख्याधिकार
झाड तोडण्याचे काम तातडीचे असल्याने क्रेन पाठवण्यात आली होती. यामध्ये माझा थेट काही संबंध किंवा परस्पर निर्णय नव्हता. तरीही नगरसेविकेचे पती प्रवीण काळे यांनी पालिकेत येऊन मला व पडळकरांना शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती आम्ही तोंडी स्वरूपात मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे.
- आकाश सानप, विद्युत अभियंता
ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली नाही, तसेच अभियंत्यांना शिवीगाळ केलेली नाही, याची चौकशी करावी. दोषी आढळल्यास शिक्षा भोगेन.
- प्रवीण काळे